"कोरोना'ने खाल्ले "एसटी'चे दोन कोटी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

कोरोना'चे अधिक रुग्ण असल्याने बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. तसेच ग्रामीण भागातील फेऱ्यांवरही काहीसा परिणाम झाल्याने फेऱ्या रद्द करण्याची वेळ येत आहे. 

जळगाव : "कोरोना व्हायरस'ची आर्थिक झळ देशाला सहन करावी लागत आहे. यात प्रवासी वाहतूक करणारी ग्रामीण भागाची जीवनवाहिनी अर्थात परिवहन महामंडळाच्या "एसटी'लाही मोठे नुकसान झाले आहे. प्रवासी संख्या कमी होऊन फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. परिणामी विभागात एका दिवसाला दोन हजार फेऱ्या रद्द कराव्या लागत असून, मागील आठ दिवसांत विभागाला दोन कोटी रुपये उत्पन्नाचा फटका सहन करावा लागला आहे. 

नक्‍की वाचा - जिल्हा उद्यापासून "लॉक डाउन'...काय असेल बंद व काय असेल सुरू पहा

"कोरोना व्हायरस'ने महाराष्ट्रात पाय पसरले असून, जिल्ह्यातही हळूहळू याचा प्रसार वाढू लागला आहे. बाहेरून येणाऱ्यांमध्ये याची लक्षणे दिसून येत आहेत. मुळात जळगाव विभागाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पुणे मार्गावरील फेऱ्या रद्द झाल्याने येथून मिळणारे उत्पन्न बुडाले आहे. पुणे व मुंबई शहरात "कोरोना'चे अधिक रुग्ण असल्याने बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. तसेच ग्रामीण भागातील फेऱ्यांवरही काहीसा परिणाम झाल्याने फेऱ्या रद्द करण्याची वेळ येत आहे. 

दिवसभरात दोन हजार फेऱ्या रद्द 
राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागांतर्गत 11 आगार आहेत. यामधून लांबपल्ल्याच्या व स्थानिकच्या मिळून साधारण पाच हजार फेऱ्या होतात. परंतु "कोरोना व्हायरस'मुळे प्रवासी संख्या कमी झाल्याने फेऱ्याही रद्द कराव्या लागत आहेत. मागील दोन दिवसांत हा परिणाम अधिक जाणवू लागल्याने शुक्रवारी (20 मार्च) जळगाव विभागातील तब्बल दोन हजार फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी सांगितले. 

पुणे मार्ग पूर्णपणे "बंद' 
जळगाव विभागाला लांबपल्ल्याच्या फेऱ्यांमध्ये पुणे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न मिळते. परंतु मागील पाच दिवसांपासून पुणे मार्गावरील सर्व फेऱ्या रद्द झाल्या आहेत. जळगाव आगारातून पुण्यासाठी रोज पाच शिवशाही बस सोडण्यात येतात. या पाचही फेऱ्या रद्द झाल्या आहेत. याशिवाय जळगाव आगारातून पंढरपूर, लातूर आणि नवसारी (गुजरात) प्रत्येकी एक फेरी रद्द झाली आहे. यातून मिळणारे तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न घटले आहे. 

विभागाला दोन कोटींचे नुकसान 
विभागातून दिवसभरात होणाऱ्या फेऱ्यांमधून साधारण एक ते सव्वाकोटीचे उत्पन्न रोज मिळते. परंतु रोज रद्द होणाऱ्या फेऱ्यांमुळे साधारण पंचवीस लाख रुपयांचे नुकसान होत असून, गेल्या आठ दिवसांत सहा ते सात हजार फेऱ्या रद्द झाल्याने दोन कोटी रुपयांचे नुकसान महामंडळाच्या जळगाव विभागाला झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus parivahan bus jalgaon division two carror loss