coronavirus : जळगावातील दोघा संशयितांचे नमुने पुण्याला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

आपले नाव छापून येईल. यामुळे आपल्या जवळ कोणी येणार नाही, की आपल्याला बाहेर जाता येणार नाही; या भीतीपोटी तो रूग्ण घरी निघून गेला. 

ळगाव : कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. साधी सर्दी, खोकला असताना देखील आता संशयित म्हणून पाहिले जात आहे. असाच एक जण तपासणीसाठी आला असताना त्यास जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र, येथे काही पत्रकार उभे असल्याचे पाहिले आणि आपले नाव छापून येईल. यामुळे आपल्या जवळ कोणी येणार नाही, की आपल्याला बाहेर जाता येणार नाही; या भीतीपोटी तो रूग्ण घरी निघून गेला. 

हेपण पहा - CoronaVirus : कोरोनाच्या धास्तीने आठवडे बाजारात शुकशुकाट

जळगावात कोरोनाची धास्ती वाढली आहे. यातच जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात आज (ता.15) दिवसभरात जळगावातील दोन संशयितांचे नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. 

वैष्णोदेवीवरून आल्याने त्रास 
जळगाव शहरात वास्तव्यास असलेला इसम वैष्णोदेवीला फिरण्यास गेले होते. तेथे घरी परतल्यानंतर त्यांना सर्दी, खोकल्याचा अधिक त्रास जाणवू लागला होता. याकरिता आज ते तपासणीसाठी रुग्णालयात गेले असता, डॉक्‍टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात कोरोनाची तपासणी करण्याचे सांगितले. यावरून ते कक्षात तपासणीसाठी आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांना पाहून रुग्णाच्या मनात धास्ती निर्माण करत आपले नाव छापून येणार म्हणून कोणाशी न बोलता आणि नमुने न देताच ते घरी निघून गेले होते. 

डॉक्‍टरांनी आणले घरून 
कोरोना कक्षात आलेला रुग्ण तपासणी न करताच घरी गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नोंदविलेल्या पत्यावर रुग्णालयातील काही कर्मचारी गेले. रुग्णाच्या घरी जाऊन त्यांचे नमुने घेण्यासाठी रुग्णालयात आणले. त्यांचे नमुने घेऊन ते पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. 

मुंबईहून आलेल्या युवतीचेही घेतले नमुने 
दरम्यान, जळगावातील युवती मुंबईला वास्तव्यास होती. ती जळगावी आल्यानंतर तिला देखील सर्दीचा त्रास जाणवत होता. यामुळे तिची तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षात आणले. यानंतर तिचे नमुने घेण्यात आले असून, युवतीला घरी पाठवून अहवाल येईपर्यंत घरात वेगळे राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

 

 सर्दी, खोकल्याचा त्रास असलेल्या दोन संशयित रूग्णांचे आज नमुने घेण्यात आले असून, ते पुढील तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होईल. 
- डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus two suspected patient civil hospital