CoronaVirus : कोरोनाच्या धास्तीने आठवडे बाजारात शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

कोरोना आजाराच्या भितीमुळे ग्राहक बाजारात खरेदीसाठी येणेच टाळत आहे. आज आठवडे बाजार असूनही सकाळपासून काहीच व्रिकी होऊ शकली नाही. तुरळक ग्राहक वगळता, संपुर्ण बाजारपेठेत मंदीचे सावट आहे. 
- प्रदीप पाटील, विक्रेता.  

भुसावळ : राज्यात कोरोनाचा होत असलेला फैलाव आणि कोरोनापासून बचावासाठी दक्षतेचे उपाय म्हणून नागरिक सध्या घराबाहेर निघणे टाळत आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला. आज भुसावळला आठवडे बाजार असूनही बाजारपेठेत मंदीचे सावट तर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे व्यापारीही धास्तावले आहेत. 

हेपण पहा - कोरोना‘बाबत सोशल मीडियावर फेक न्यूज    

कोरोना आजारापासून बचावासाठी नागरिक गर्दीत जाणे टाळत आहे. नागरिकांकडून बाजारपेठेतील गर्दीची ठिकाणे, मॉल्स, हॉटेल्स अशा ठिकाणी जाणे टाळण्यास सुरुवात केल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोडसह परिसरातील मोठ-मोठी दुकाने ओस पडल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक गरजेच्या गोष्टी वगळता, अन्य वस्तूंची खरेदी पुढे ढकलण्याचा पर्याय नागरिकांकडून स्वीकारला जाताना दिसत आहे.

क्‍लिक करा -coronavirus : इटली, दुबईहून धुळ्यात परतलेल्यांचे "नॉर्मल रिपोर्ट'

आज रविवारचा आठवडे बाजार होता, ऐरवी तालुक्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदीसाठी येतात. त्यामुळे रविवारचा आठवडे बाजार म्हटला की, पाय ठेवायलाही जागा नसते. मात्र आज तर तुरळक ग्राहक वगळता संपूर्ण बाजारपेठेवर मंदीचे सावट दिसून आले. व्यापारी मात्र दिवसभर ग्राहकांच्या प्रतिक्षेत होते. तर आवश्‍यक कामाव्यतिरीक्त नागरिक घराबाहेर जाणे टाळत असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. 

मास्कला मागणी 
भुसावळ शहरात या आजाराचा प्रभाव नसला तरी, राज्यात या आजाराचा प्रसार होऊ लागल्याने भुसावळातही नागरिकांकडून सॅनिटायझर आणि मास्कची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून सॅनिटायझर, मास्कचा तुटवडा जाणवत असून, हात स्वच्छ करण्याचे अन्य द्रव पदार्थही अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal corona virus impact weakly market no customer