शहरातील 124 वाढीव वस्त्यांमध्ये पोहोचणार पाणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

अमृत योजनेसंदर्भात झालेल्या बैठकीत महापौरांनी याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहरातील 124 नवीन वसाहतीमध्ये अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याबाबत कामाचा प्रस्ताव तयार केला जात आहे. 
 

जळगाव : शहरात केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेतून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यात आता जलवाहिनीच्या मध्यवर्ती भागात कामाला सुरवात होणार आहे. मात्र, या योजनेतून शहरातील वाढीव वस्तीमध्ये जलवाहिनीचे काम नसल्याचे महापौरांच्या लक्षात आले होते. त्यानुसार अमृत योजनेसंदर्भात झालेल्या बैठकीत महापौरांनी याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहरातील 124 नवीन वसाहतीमध्ये अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याबाबत कामाचा प्रस्ताव तयार केला जात आहे. 

हेपण पहा - आमदार निधी खर्चाबाबत उदासीनताच! 

शहरात अमृत योजनेंतर्गत सुमारे साडेसहाशे किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु अमृत योजनेचे काम कासवगतीने सुरू असल्याने ही योजना बारगळत गेली होती. त्यात नोव्हेंबर 2019 मध्ये मक्तेदाराची मुदत संपली होती. मक्तेदाराला सहा महिन्यांची मुदतवाढ महापालिकेने दिली आहे. त्यामुळे शहरातील वाढीव वस्त्यांमध्ये ज्या भागात अमृत जलवाहिनीचे काम आधी नव्हते, तेथे आता या योजनेतून कामे केली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या अभियंत्यांकडून शहरातील वाढीव वस्त्यांतील जलवाहिनीच्या कामांचा प्रस्ताव मागितला आहे. त्यात 124 नवीन वसाहती असल्याचे आढळून आले आहे. जलवाहिनीच्या कामांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून, त्या प्रभागातील अभियंत्यांकडून केले जात आहे. 

क्‍लिक करा - पत्नीशी अनैतिक संबंध म्हणून धमकावले...त्याने संपविले जीवन

नागरिकांना दिलासा 
शहरातील वाढीव वस्त्यांमध्ये जलवाहिनी नसल्याने मागील वर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. तसेच अजून देखील जलवाहिनी नसल्याने तेथील नागरिकांना पाणी दुरून आणावे लागत आहे. अमृत योजनेत या वसाहतींचा देखील आता समावेश होत असल्याने वाढीव वस्त्यातील नागरिकांना देखील लवकरच अमृत जलवाहिनीतून पाणी मिळणार आहे. 

विकास आराखडा लवकरच 
शहरातील 124 वसाहतींमध्ये जलवाहिनीची नवीन कामे प्रस्तावित करण्याचे प्रस्ताव तयार केले जात आहे. प्रस्ताव मंजूर केल्यावर या कामांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम केले जाणार आहे. त्यानंतर कामाला सुरवात होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporaion amarut water schem 124 other aria devloap