शहर विकासाचा मार्ग मोकळा; विकासकामांची स्थगिती शासनाने उठविली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

शहरातील विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्या निधीतून शहरात गटारी, नाल्यांची, संरक्षण भिंत, मोकळ्या जागांचा विकास, जॉगिंग ट्रक, ओपन जीम अशी कामे केली जाणार होती.

जळगाव : शहरातील विकासकामांसाठी विविध योजनांतर्गत केलेल्या कामांना शासनाकडून स्थगिती देण्यात आली होती. यातील 42 कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया बांधकाम विभागाने सुरू केली होती. परंतु त्याला स्थगिती मिळाल्याने या कामांना ब्रेक लागला होता. मात्र, शासनाने आता दिलेली स्थगिती उठविली असून, शहरातील विकासकामांचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली. 
शहरातील विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्या निधीतून शहरात गटारी, नाल्यांची, संरक्षण भिंत, मोकळ्या जागांचा विकास, जॉगिंग ट्रक, ओपन जीम अशी कामे केली जाणार होती. मात्र, शासनाने स्थगिती दिल्याने शंभर कोटींच्या निधीतून आतापर्यंत एक रुपयाही खर्च झालेला नव्हता. त्यामुळे शहरातील विकासकामांना ब्रेक लागून सर्व कामे रखडलेली होती. मात्र, आता शासनाकडून या कामांना लावण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली असल्याने शहरातील रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊन विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

निविदा प्रक्रियेबाबत अधिकारीही संभ्रमात 
जळगावच्या विकासासाठी शासनाकडून महापालिकेस शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून विकासकामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राधिकृत करण्यात आले आहे. शंभर कोटींतून 42 कोटींच्या कामांची निविदा काढण्यात आली होती. त्याच कालावधीत शासनाने स्थगिती दिली होती. मात्र, निविदा प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. स्थगिती उठविल्यानंतर ही निविदा प्रक्रिया पुन्हा राबवावी लागते की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शासनाने स्थगिती उठविली असली, तरी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश देण्यापर्यंतच्या कार्यवाहीचा अहवाल 30 एप्रिलपर्यंत सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठाकले आहे. 

विकासकामांचा मार्ग मोकळा 
तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासकामांसाठी दिलेल्या शंभर कोटींच्या निधीतून शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामे केली जाणार आहेत. विकासकामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया राबविली असून, 42 कोटींची निविदा 30 डिसेंबरपर्यंत मागविण्यात आल्या होत्या. मात्र, शासनाने विकासकामांसाठी दिलेल्या निधीला स्थगिती दिली होती. मात्र, आता ही स्थगिती शासनाने उठविली असून, शहरातील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

"सार्वजनिक'च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊ : महापौर 
शहरातील विकासकामांसाठी मंजूर झालेल्या शंभर कोटींच्या कामांसाठी मिळालेल्या निधीची स्थगिती शासनाने उठविली आहे. स्थगितीमुळे शहरात प्रलंबित असलेली 42 कोटींची विकासकामे होणार आहेत. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation city devlopment work open