नागरिकांच्या घरापर्यंत घंटागाड्या पोहोचेना! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

शहरातील दैनंदिन कचरा संकलन व सफाईचा मक्ता महापालिकेने नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला दिला. परंतु सहा महिन्यांतच "वॉटरग्रेस'ने काम बंद केले. त्यामुळे शहरात कचराकोंडी झाली आहे.

जळगाव : शहरात गेल्या महिन्याभरापासून कचराकोंडी झालेली असल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सफाई व कचरा संकलन केले जात असले, तरी रस्त्यावर व तसेच अनेक वसाहतींच्या मोकळ्या जागेत कचरा पडलेला असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून घंटागाड्या जरी सुरू झाल्या, तरी घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या या घरोघरी अजूनपर्यंत पोहोचत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. 

नक्‍की वाचा - एकट्यात रडताना आईचे हुंदके अन्‌ तिच्या कष्टाची जाणीव!

जळगाव शहरातील दैनंदिन कचरा संकलन व सफाईचा मक्ता महापालिकेने नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला दिला. परंतु सहा महिन्यांतच "वॉटरग्रेस'ने काम बंद केले. त्यामुळे शहरात कचराकोंडी झाली आहे. त्यामुळे शहरात जागोजागी तसेच रस्त्यांवर कचरा साचल्याने जळगावकरांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यात महापौर भारती सोनवणे पुढाकार घेत तसेच आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मक्तेदाराकडून घंटागाड्या ताब्यात घेऊन त्या आठ दिवसांपासून कचरा संकलनाचे काम सुरू केले. 

क्‍लिक करा - शहरात अस्वच्छता करणाऱ्या "वॉटरग्रेस'चा मक्ता रद्द करा : माजी मंत्री महाजन

घंटागाड्या मधल्या वस्त्यांत नाहीच! 
महापालिकेने कंचरा संकलनासाठी घंटागाड्यांवर वाहनचालक नियुक्त करून सुविधा केली. सद्यःस्थितीत 74 घंटागाड्या जरी सुरू असल्या, तरी कचरा संकलनाचे काम व्यवस्थित होत नसल्याचे दिसत आहे. अनेक वसाहतींमध्ये गेल्या महिनाभरापासून तसेच अजूनपर्यंत घंटागाड्या गेलेल्याच नसल्याने मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. तसेच घंटागाड्यांवरील ध्वनिक्षेपकही बंद असल्याने घंटागाडी घरासमोरून गेली, तरी नागरिकांना त्यासंदर्भात काहीही कळत नाही. 

दोन शिप्टमध्ये कचरा संकलन 
आरोग्य विभागाने शहरातील कचरा संकलनाची यंत्रणा दोन शिप्टमध्ये राबविण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार बंद पडलेली वाहने दुरुस्त करून वाहनांची संख्या वाढवून कचरा संकलनाचे काम केले जाणार आहे. 

सफाई कामगारांची टेंडर प्रक्रिया सुरू 
चार प्रभाग समित्यांनुसार महापालिका प्रशासन सफाई कामगार वाढवत आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली असून, प्रत्येक प्रभागात दोन किवा तीनपेक्षा अधिक निविदा आलेल्या आहेत. लवकरच टेंडर ओपन करून मक्तेदाराची निवड केली जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation ghantagadi home to home