vishal sapkale
vishal sapkale

एकट्यात रडताना आईचे हुंदके अन्‌ तिच्या कष्टाची जाणीव!

जळगाव : दुसऱ्याच्या शेतात आईने केलेली मजुरी, कष्टाने गाळलेल्या घाम नजरेसमोर होता. घरात बसून एकट्यात रडताना तिचे हुंदके आजही आठवतात. याची जाणीव ठेवत विशालरुपी "श्रावण बाळाने' उतरत्या वयात संघर्षाच्या प्रवासाला पूर्णविराम दिला. लोकाच्या शेतात राबून हातावरचा संसाराला सावरत जगायला व लढायला शिकवले. पैसा नव्हता तरी मित्रांची मदत घेऊन मार्ग काढत विशालने परिस्थितीला धूळ चारत पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत विशेष मागासवर्गीय प्रवर्गातून राज्यात दुसरा येण्याचा मान मिळविला. 


कठोरा (ता. जळगाव) हे छोटेसे गाव. घरात तशी शिक्षणाची पार्श्‍वभूमी नाही. शेतीचाच व्यवसाय होता. आई मालुबाई ही दुसऱ्याच्या घरी मोलमजुरी करायची. तर वडील परशुराम दारू पिऊन घरात वाद घालायचे. इलेक्‍ट्रिक कामातून मिळणारे पैसे दारूतच जायचे. म्हणून संपूर्ण जबाबदारी आईवर असल्याने मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालविला आणि मुलांना शिक्षण देखील दिले. यांच्या पोटी जन्माला आलेला "संघर्ष योद्धा' गरीब घरात जन्मला तरी त्याचे स्वप्न मात्र नावाप्रमाणे "विशाल' होते. 

पहिल्याच प्रयत्नात यश 
अभ्यास करण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसताना 2017 ला शहरात अभ्यासाला सुरवात केली. पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवत राज्यात दुसरा क्रमांक आला. मुख्य परीक्षेला औरंगाबादला जाण्यासाठी दुसऱ्याकडून पैसे घेऊन प्रवास केला. ज्या आईने लोकांच्या शेतात काम केले, त्या मातेच्या कष्टाला खऱ्या अर्थाने विशालने फळ दिले. दहावीपर्यंत मामाकडे तर "कमवा व शिका' योजनेत काम करून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. तर कधी हॉस्पिटलमध्ये काम करून उदरनिर्वाह केला. शेवटी यशाची पताका अभिमानाने फडकवली. 

वाचनालयाचा आधार 
स्पर्धा परीक्षा म्हटलं की पुणे, मुंबई क्‍लासेस येतात. त्याच्याशिवाय यश संपादन करणे अवघड असा समज विद्यार्थ्यांमध्ये असतो. विशाल मात्र या सर्व बाबींना अपवाद ठरला. आरामदायी स्वप्नांच्या पाठीशी न धावता आहे, त्या ठिकाणी अभ्यासाला महत्त्व दिले. क्‍लासेसची, वाचनालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने कधी मंदिरात तर कधी वाचनालयाचा आधार घेतला. मित्रांनी दिलेले पुस्तक वाचायचे. मिळेल त्या नोटस्‌ वाचायच्या आयुष्याच्या वाटेवर काटेरी प्रवास करत असताना मित्र परिवाराची साथ महत्त्वाची असल्याचे विशालने "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

दोन वर्ष एकच ड्रेस 
गावात राहून परिस्थितीला सामोरे कसे जाणार हा प्रश्‍न समोर होता. आईला दुसऱ्याच्या शेतात राबताना बघून मन खिन्न व्हायचे. आई शेतात राबली, तर रात्री जेवण मिळेल, अशी परिस्थिती होती. तीन भावंडांना सांभाळत असताना तिची होणारी तारांबळ डोळ्यांना बघवली जात नव्हती. हे सर्व होत असताना स्वतःला सिद्ध केले पाहिजे. परिस्थितीच्या नावाने रडून चालणार नाही. हे मनाशी बांधून विशाल जळगावला खिशात असलेल्या शंभर रुपये घेऊन आहे त्या कपड्यांवर निघाला. जळगावात आल्यावर मित्रांच्या मदतीने अभ्यासाला सुरवात केली. दोन वर्ष वेगवेगळ्या मित्रांच्या रुमवर राहून अभ्यास केला. आज यशात आई-बाबानंतर मित्रांचा मोठा आधार असल्याचे विशाल आवर्जून सांगतो. 

सातत्य अन्‌ संघर्षाची जाणीव 
परिस्थिती बिकट असल्याची जाणीव होती. अनेकवेळा परिस्थितीला दोष देत बसायचो; पण यात काही अर्थ नव्हता. अभ्यासात सातत्य ठेवले. एकट्यात रडणाऱ्या आईचे हुंदके आजही कानात गुणगुणतात हे सर्व मला परिस्थितीशी लढायला बळ देणारे ठरले. जेवणाचा खर्च करण्याची एपत नसल्याने एकवेळ मेस लावलेली होती. त्याच्यातून उदरनिर्वाह केला व आज येथे पोहचलो. "आयपीएस' होण्याचे ध्येय पूर्णत्वास आल्याने मनस्वी आनंद होत असल्याची भावना विशालने व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com