कापूस शेतकऱ्याचा की व्यापाऱ्याचा; खात्रीसाठी अधिकारी नियुक्त करा : पणन संचालक संजय पवार 

cotton
cotton

जळगाव: कापूस शेतकऱ्यांचा की व्यापाऱ्यांचा यावरून शंका येऊन जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रावर वाद होत आहेत. हा वाद टाळण्यासाठी सक्षम महसूल अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी राज्य पणन संचालक व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजय पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

संजय पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावे काही व्यापारी माल आणत असल्याने वाद निर्माण होत आहेत. परिणामी कापूस खरेदीवर त्याचा परिणाम होतो, सध्याच्या स्थितीत वाद होऊ न देणे आणि गर्दी टाळण्यासाठी आपण प्रशासनाच्या वतीने प्रत्येक खरेदी केंद्रावर पूर्णवेळ पोलिस कर्मचारी नियुक्त करावा. केंद्रावर कापूस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या केवळ नोंदणी आणि कागदपत्रे पाहूनच कापूस खरेदी केला जातो, प्रत्यक्षात हा कापूस शेतकरी किंवा व्यापारी यांचा आहे याची खात्री करण्यासाठी महसूल विभागातील एका सक्षम अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची केंद्रावर नियुक्ती करावी. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम यादी खरेदीच्या तारखेसह आपल्या स्तरावरून निश्‍चित करून द्यावी. पुढील 10 दिवसात पावसाची शक्‍यता असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला आणि शासनाने खरेदी केलेला कापूस खराब होऊ नये म्हणून आपण आपल्या स्तरावर गोदामे, आणखी जिनिंग कारखाने अधिग्रहीत करून द्यावी. कापूस खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळावे म्हणून पाठपुरावा करण्यासाठी पूर्णवेळ सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करावी. पणन महासंघ ही केवळ नोडल एजन्सी असल्याने खरेदी केंद्रावर शेतकरी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी, थर्मल स्क्रिनिग करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून द्यावा. लॉकडाउनमुळे वेळेत सरकी लिलाव व्हावे म्हणून सीसीआय आणि पणन महासंघ यांच्यात समन्वयासाठी आपल्या स्तरावर तातडीने बैठक घ्यावी. खरेदी केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्यांना "शिवभोजन थाळी' उपलब्ध करून द्यावी, तयार होणाऱ्या कापूस गाठी सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाच्या मालकीचे एफसीआयचे गोदाम मोफत उपलब्ध करून द्यावे केंद्रावर महासंघाची यंत्रणा कमी आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांचा संभाव्य त्रास पाहता उपविभागीय अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी दररोज खरेदी केंद्राला भेट द्यावी असे पत्रात म्हटले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com