सिंचनासह औद्योगिक वसाहतीचा मुद्दा ऐरणीवर 

सुरेश महाजन,
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत जामनेर तालुक्यात धरणे, तलावांची संख्या अधिक असली, तरी गेल्या दोन-तीन वर्षांपासून निर्माण झालेले दुष्काळाचे सावट आणि भविष्यकालीन योजनांमधील अंमलबजावणीच्या अभावामुळे सिंचनवाढीसह औद्योगिक वसाहत विकसित करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत जामनेर तालुक्यात धरणे, तलावांची संख्या अधिक असली, तरी गेल्या दोन-तीन वर्षांपासून निर्माण झालेले दुष्काळाचे सावट आणि भविष्यकालीन योजनांमधील अंमलबजावणीच्या अभावामुळे सिंचनवाढीसह औद्योगिक वसाहत विकसित करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

जामनेर तालुक्यातील सामरोद, टाकरखेडा, ओझर, गारखेडा, पळासखेडा आदी परिसर ‘केळीचा पट्टा’ म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या आठ-दहा वर्षांमधील सुयोग्य सिंचन व्यवस्थेअभावी व पावसाच्या अवकृपेमुळे शेतकरी केळी पिकापासून दूर झाला आहे. तसे पाहिले तर एकट्या वाघूर प्रकल्पामुळे तालुक्यातील २५ ते ३० टक्के भूभागातील पाण्याची चांगलीच मदत होते. त्यातून शेती क्षेत्रासाठीही पाणी वापरले जाते, तरीही दीर्घकालीन पिकांकडे शेतकरी वळताना अपवादानेच आढळतो. आता बहुतांश शेतकऱ्यांचाही ओढा नगदी म्हणून गणल्या गेलेल्या कपाशी पिकाकडे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, कापसालाही पाहिजे तसा भाव मिळत नसल्याची नाराजीही आता लपून राहिलेली नाही. 

टेक्स्टाइल पार्क आणि अपेक्षा 
आठ-दहा वर्षांपूर्वी केळीसाठी जिल्हाभरात प्रसिद्ध असलेला तालुक्यातील शेतकरी कपाशीकडे वळल्याने पेरणीयोग्य शेती क्षेत्रातील जवळपास ७० टक्क्यांवर कपाशी घेतली जाते. त्यामुळे शासकीय व व्यापारीवर्गाकडून कापसाला रास्त भाव बहुतांश वेळी मिळतच नाही, त्यावर पर्याय म्हणून या तालुक्याचे आमदार व राज्याचे ‘वजनदार मंत्री’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या गिरीश महाजनांनी दोन वर्षांपूर्वी मोठी व अद्ययावत सोयी-सुविधांनीयुक्त अशा औद्योगिक वसाहत उभारण्याची घोषणा केली होती. त्यामध्ये कापसावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी ‘टेक्स्टाईल पार्क’ची घोषणा केली होती. ही योजना मूर्त स्वरूपात येऊ शकली, तर तालुक्यासह जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव भावासह तरुणांना रोजगाराचीही मोठी संधी उपलब्ध होईल, असा मूळ उद्देश यामागे आहे. मात्र, सध्यातरी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारणीसाठी मोठी अडचण आहे, ती म्हणजे नामांकित कापड उद्योग येण्याची. अशा कंपन्यांच्या येण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीला आणखी बळ द्यावे लागेल. तसे पाहिले तर प्राथमिक सोयी-सुविधांसाठी जमिनींच्या सपाटीकरणासह अन्य कामांनी वेग घेतलेला दिसतो. आता अपेक्षा आहे, ती लाखो लोकांच्या स्वप्नवत असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सुरू होण्याचीच. 

पिण्याच्या पाण्याची समस्या 
तालुक्यात धरणे, तलावांची संख्या पस्तीसच्या जवळपास आहे. यंदा पावसाअभावी त्यात ठणठणाट आहे, तर दुसरीकडे संबंधित ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे अनेक योजनांमधील पाणी संबंधित गावांना अजूनही मिळालेले नाही. त्यामुळे आता दीडशेपैकी २५ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मदार टँकर आणि विहिरींच्या अधिग्रहणावरच अवलंबून आहे. रोटवद, वाघारी, लाखोली, लिहेदिगर, सार्वे, तिघ्रे-वडगाव या सहा गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जशी उन्हाची तीव्रता वाढत जाईल, तशी टँकरच्या संख्येतही वाढ होईल, हे निश्‍चित. त्यामुळे वरील सर्वच समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधून मनमानी कारभार करणाऱ्या ठेकेदारांना दूर सारून योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 

Web Title: marathi news jalgaon dairy repoter jamner taluka