हद्दीच्या वादातून मृतदेह पाच तास रेल्वेरुळावर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जुलै 2019

जळगाव : बजरंग बोगद्यापासून जवळ असलेल्या पेट्रोलपंपासमोरील रेल्वेरुळावरुन धावणाऱ्या मालगाडीखाली प्रौढाने आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आत्महत्या केली. यावेळी स्टेशन प्रबंधकाने त्या परिसरातील हद्दीत असलेल्या तीन पोलिस ठाण्यांशी फोनवर संपर्क साधून माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडून आमची हद्द नसल्याचे सांगण्यात आले. या हद्दीच्या वादामुळे त्या प्रौढाचा मृतदेह तब्बल पाच तास रेल्वेरुळाच्या कडेला पडलेला होता. अखेर लोहमार्ग पोलिसांनी तो मृतदेह ओळख पटविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. 

बजरंग बोगद्याजवळील मध्यरेल्वेच्या डाऊन खांबा क्रमांक 417/31 ते 418/1 दरम्यान एका 50 वर्षीय प्रौढाने सकाळी साडेदहाच्या सुमारास भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडीखाली आत्महत्या केली. त्या प्रौढाच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत ट्रॅकमन विकास साबळे यांनी याबाबतची माहिती रेल्वे प्रबंधकांना कळविली. त्यानंतर सुरवातीला स्टेशन प्रबंधकांनी या घटनेचा मेमो जिल्हापेठ पोलिसांना दिला. मात्र, त्यांच्याकडून हद्दीचे कारण पुढे करीत स्टेशन प्रबंधकांचा मेमो नाकारण्यात आला. त्यानंतर प्रबंधकांनी कंट्रोल रूमला फोन लावून माहिती दिली असता त्यांनी रामानंदनगर पोलिसात मेमो देण्याचे सांगितले. मात्र, त्याठिकाणी देखील हद्दीचे कारण पुढे करून मेमो घेण्यास नकार दिला. यानंतर प्रबंधकांनी पुन्हा कंट्रोल रुमला फोन करून माहिती विचारली असता त्यांनी तालुका पोलिसांत मेमो देण्याचा सल्ला दिला. परंतु तालुका पोलिसांनी हद्दीचे कारण पुढे करीत मेमो घेण्यास नकार दिला. 

पोलिसांकडून केवळ पाहणी 
सकाळी साडेदहाच्या सुमारास प्रौढाने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वेरुळाच्या कडेला पडून होता. त्याच त्याठिकाणी त्या प्रौढाची काळ्या रंगाची एक बॅग देखील पडलेली होती. सकाळपासून पडलेल्या मृतदेहाजवळ अनेक पोलिसांनी पाहणी करून ते त्या ठिकाणाहून निघून गेले. मात्र, एकाही पोलिसाने पुढाकार न घेता तो मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला नाही. सकाळपासून पडलेल्या मृतदेहाची सायंकाळपर्यंत दखल न घेतली गेल्यामुळे त्यांच्या कर्तव्यदक्षतेबाबत साशंकता निर्माण केली जात होती. 

भर पावसात मृतदेहाची अवहेलना 
अनोळखी प्रौढाने सकाळच्या सुमारास आत्महत्या केल्यानंतर दुपारी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. मात्र, यावेळी त्या प्रौढाचा मृतदेह रेल्वेरुळावरच पडून असल्याने पोलिसांकडून झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांकडून पोलिसांच्या माणुकीबाबत वावडे उठविले जात असून, मृतदेहाची अवहेलना केली जात होती. 

लोहमार्ग पोलिसांनी घेतला मृतदेह ताब्यात 
तिन्ही पोलिस ठाण्यांकडून हद्दीची कारणे दाखविल्यानंतर कोणतेच पोलिस ठाणे पुढाकार घेत नसल्याने अखेर पाच तासानंतर लोहमार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून सायंकाळच्या सुमारास मृतदेह ओळख पटविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon daithbody railway line police