धरणगाव तालुक्यातील विहिरी, नद्या कोरड्याठाक 

live photo
live photo

धरणगाव ः अंजनी, गिरणा आणि तापी अशा तीनही नद्या असलेल्या धरणगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. विहिरी कोरड्याठाक असून, कूपनलिका बंद पडल्या आहेत. सहाशे ते आठशे फूट केलेले कूपनलिकाही बंद पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना होणे गरजेचे आहे. 
प्रत्येक उन्हाळ्यात धरणगाव शहराचा पाणीप्रश्‍न गंभीर बनतो. सध्या शहरात दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. शहरासाठी तापी नदीवरील धावडा येथून पाणीपुरवठा होतो. मात्र, या डोहात पाणी कमी होत असून, हतनूर व गूळ मध्यम प्रकल्पातून आवर्तनाची मागणी केलेली आहे. तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या अंजनी नदीचा परिसर पाण्यावाचून बिकट अवस्थेत आहे. एकेकाळी ऊस आणि केळीचा हा पट्टा होता. आता ऊस, केळी नजरेला पडत नाही. बारमाही वाहणारी नदी बारमाही आता कोरडी असते. एरंडोल येथे अजनी नदीवर झालेल्या धरणाचाही परिणाम धरणगाव तालुक्यातील अंजनी काठच्या गावांवर झाला आहे. तालुक्यात जामदा डाव्या कालव्याची यंत्रणा आता नालाच शिल्लक आहे. या कालव्यातून पाणी वाहण्याची अपेक्षा आता दुरापास्त झालेली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. 
तालुक्यातील महसूल सजाच्या ८८ गावांपैकी ३५ गावांमध्ये विहीर अधिग्रहण केलेल्या आहेत. मात्र, या विहिरींमध्ये पाण्याची पातळीही खालावली आहे. पिंपळे येथे प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

बागायती शेती हद्दपार 
तालुक्यात यावर्षी निवडक गावे सोडली तर बागायत म्हणून रब्बीचा हंगाम दिसून येत नाही. सर्वदूर ओसाड जमिनी पडलेल्या आहेत. शेतीची मशागत करून येणाऱ्या पावसाच्या प्रतीक्षेतच शेतकरी राजा दिसून येत आहे. तालुक्यात पाणी आडवा पाणी जिरवा, जलयुक्‍त शिवार योजनांचा बोजवारा उडाला आहे. सर्वत्र पाझर तलाव ठणठणीत आहेत. पाण्याचे स्त्रोत दिसून येत नाही. शासनाची ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 

प्रशासनाचे दुर्लक्ष 
तालुक्यातील कल्याणेहोळ येथील ग्रामपंचायतीने साधारण दीड महिन्यापूर्वी एक विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव प्रशासनाला दिला होता. जी विहीर अधिग्रहण करणार होते ती विहिरही आता कोरडी झालेली आहे. मात्र, अद्याप प्रशासनाने याबाबत कार्यवाही केलेली नाही. प्रशासन पाणीटंचाई गांभिर्याने घेत नाही, असे दिसून येते. चार ठिकाणी कूपनलिका केल्या. मात्र, पाणी लागले नाही. सरपंच रमेश पाटील हे परिसरातून मिळेल तेथून टँकरने पाणी घेऊन गावाची तहान भागवत आहेत. सोबत जनकल्याण समितीच्या तालुका दुष्काळ विमोचन समितीतर्फे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरसाठी अर्थसाहाय्य केले जात आहे. 

रब्बीचे प्रमाण घटले 
तालुक्यातील ४३ हजार ०८९ हेक्‍टर वहिवाटीधारक जमिनीपैकी केवळ २ हजार १८ हेक्टर जमिनीत रब्बी उत्पादन घेण्यात आले. यात ज्वारीचे प्रमाण साधारण ६३ टक्के असून, उर्वरित गहू, मका, हरभरा आहे. ऊस, केळी, फळबाग ही पिके नाहिशी झालेली आहेत. प्रथमच रब्बीचे एवढे कमी क्षेत्र दिसून येत आहे. 

वाढीव वस्तीची समस्या बिकट 
धरणगाव शहराबाहेरील एरंडोल रस्त्यालगत १५ ते २० कॉलन्या आहेत. हा सर्व भाग पालिका हद्दीबाहेर आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी स्वतंत्र कूपनलिका करून व्यक्तिगत पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र, या परिसरात आता जवळपास सर्वच कूपनलिका बंद पडल्या असून, खासगी टँकरने साधारण सातशे, आठशे रूपये मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. मोठ्या लोकवस्तीच्या या परिसरात प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना नाही. अनेक नोकरदार पाण्यासाठी काही दिवस स्थलांतरित होत आहेत. टँकर मागणीला नंबर लागलेले असतात. प्रशानाकडे याकडे दिले पाहिजे. 

विहीर अधिग्रहण 
तालुक्यातील आनोरे, वंजारी खपाट, सोनवद बुद्रुक, सतखेडा, पथराड बुद्रुक, पथराड खुर्द, धानोरा, बांभोरी बुद्रुक, बोरखेडा, हिंगोणे खुर्द, कल्याणे खुर्द, झुरखेडा, फुलपाट, भामर्डी, गारखेडा, साकरे, मुसळी, भोद खुर्द, वंजारी बुद्रुक, खर्दे बुद्रुक, खामखेडा, वराड बुद्रुक, पिंपळे सीम, पष्टाणे, उखळवाडी, गारखेडा, चावलखेडा, वाघळूद खुर्द, वाघळूद बुद्रुक, बाभुळगाव, गंगापूरी, वराड खुर्द अशा ३५ गावांना विहीर अधीग्रहण केलेल्या आहेत. पिंपळे येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

शेतकऱ्यांची नाराजी 
शासनाने जाहीर केलेले दुष्काळी अनुदान, शेतकरी सन्मान योजना यांचे पैसे अनेकांना अद्याप मिळालेले नाहीत. शेतीचे उत्पादन नाही, त्यामुळे रोजगार नाही, पाणी, चाऱ्याअभावी पशुधन कमी होत आहे. दूध उत्पादनात घट झालेली आहे. जनावरांना बाजारात किंमत नाही. भविष्यातही सर्व परिस्थिती सुधारेल किंवा नाही याची शाश्‍वती नाही. यामुळे शेतकरी नाराज आहेत. 


सध्या शहरात दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याचा गैरवापर करून नये, नळांना तोट्या बसवाव्यात, असे आवाहन नागरिकांना करत आहोत. यासाठी एक पथक नेमून गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. शहराची पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 
- अंजली विसावे, उपनगराध्यक्ष, धरणगाव. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com