मनोरुग्णाने दोन बालकांना विहिरीत ढकलल्याचा संशय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

धानोरा (ता. चोपडा) ः येथील एका मनोरुग्णाने गावातील पाच वर्षीय मुलगी व तीन वर्षीय मुलाला विहिरीत ढकलून दिल्याचा संशय असून, रात्री उशिरापर्यंत या बालकांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. 

धानोरा (ता. चोपडा) ः येथील एका मनोरुग्णाने गावातील पाच वर्षीय मुलगी व तीन वर्षीय मुलाला विहिरीत ढकलून दिल्याचा संशय असून, रात्री उशिरापर्यंत या बालकांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. 
येथील संशयित आरोपी मनोरुग्ण खालिद शेख इस्माईल याने त्याच्या वाड्यातील तनवीर शेख मेहबूब (वय 3) व अलिजा शेख मेहबूब (वय 5) यांना दुपारी चारच्या सुमारास शेतात नेवून विहिरीत ढकलून दिल्याचा प्रकार पालकांच्या लक्षात आला. त्यावेळी मुलांच्या पालकांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी शेत शिवाराकडे धाव घेतली. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर बालके सापडली नाहीत. त्यानंतर पालकांनी हा सर्व प्रकार पोलिसपाटील दिनेश पाटील यांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हा प्रकार पोलिस प्रशासनाला कळविला. त्यानंतर अडावदचे पोलिस उपनिरीक्षक राहुलकुमार पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयित आरोपीला गावापासून दोन किलोमीटरवर शेतशिवारातून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने या दोन्ही बालकांना विहिरीत ढकलल्याचे सांगितले. मात्र, थोड्याच वेळात त्याने मी बालकांना विहिरीत ढकलले नसून, शेतात सोडले आहे, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संशयिताने सुरवातीला सांगितल्यानुसार विहिरीत शोधमोहीम राबविणे सुरू केले. विहिरीतील पाणी उपसण्यासाठी पोलिसांनी शेतातील वीजपुरवठा सुरू करण्याबाबत वीज कंपनीला सांगितले. त्यानंतर वीजपुरवठा सुरू झाल्यावर रात्री उशिरापर्यंत विहिरीतील पाणी उपसण्याचे काम सुरू होते. यावेळी विहिरीत पोलिसांनी विजेची व्यवस्थाही केली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव ठाण मांडून होते. दरम्यान, रात्री जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यांनी घटनास्थळी जमा झालेल्या तरुणांना परिसरातील अन्य विहिरींमध्येही शोध घेण्याचे आवाहन यावेळी केले.

Web Title: marathi news jalgaon dhanora manorugn child