बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

चोपडा : शहरासह तालुक्‍यात बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट आहे. कुठलेही वैद्यकीय शिक्षणातील पदवी घेतलेली नसताना रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. प्रशासकीय तपासणी केवळ नावालाच असून, बोगस डॉक्‍टर्सवर कारवाईची गरज आहे. 

चोपडा : शहरासह तालुक्‍यात बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट आहे. कुठलेही वैद्यकीय शिक्षणातील पदवी घेतलेली नसताना रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. प्रशासकीय तपासणी केवळ नावालाच असून, बोगस डॉक्‍टर्सवर कारवाईची गरज आहे. 
शहरासह तालुक्‍यातील बहुतांशी आदिवासी गावांमधे वाड्या वस्त्यांवर आठवड्याचा एक दिवस बोगस डॉक्‍टरांचा ठरलेला असतो. छोट्याशा खोलीत दवाखाना थाटून शेकडो रुग्णांची बोगस डॉक्‍टर्स तपासणी करून ते पैसे उकळत आहेत. यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याने असे प्रकार सर्रास आहेत. तालुक्‍याच्या उत्तर भागातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये आदिवासी पट्ट्यात वैजापूर, कर्जाणे, मेलाणे, देवगड, देवझिरी या भागात व परिसरात हे बोगस डॉक्‍टर काम करत आहेत. अंमलवाडी, मोरचिडा, गोवऱ्या व उमर्टी या गावांना अवैध वैद्यकीय व्यवसाय चालत असल्याचे खुद्द गावातील प्रतिष्ठितांनी सांगितले आहे. शहरातील एखाद्या खासगी दवाखान्यात काही दिवस कंपाउंडर म्हणून काम करायचे. त्यानंतर स्वत:चा दवाखाना थाटायचा असा प्रकार सुरू आहे. मात्र, औषधी बरोबर दिली जातात का ? औषधीचा डोस योग्य आहे का ? त्याचा रुग्णाच्या शरीरावर विपरीत परिणाम तर होणार नाही ? याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. 
 
स्टिरोइड ड्रग्सचा वापर 
रुग्णास त्वरित आराम मिळावा म्हणून हे डॉक्‍टर सर्रास स्टिरोइड ड्रग्सचा वापर करीत आहेत. जास्त प्रमाणात (हायडोस) औषधीचा वापर करीत असल्याने त्यांच्या शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणामही होत असल्याच्या काहींच्या तक्रारी आहेत. 
 
आदिवासी भागात आरोग्य केंद्राची मागणी 
सातपुडाच्या आदिवासी पट्ट्यात सुमारे 36 खेडे आहेत. मात्र, असे असूनही या आदिवासी भागात वैजापूर व लासुर या दोनच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सातपुड्यातील दुर्गम भागात असलेले आदिवासी पट्ट्यातील गावे सुमारे तीस किलोमीटर दूर आहेत. गाव दुर्गम भागात येत असल्याने आरोग्याच्या सेवा मिळत नाही, म्हणून अशा बोगस डॉक्‍टरांचे फावत आहे. यासाठी आरोग्य विभागाने यांचा शोध घेणे गरजेचे आहे. अशा भागात आरोग्य केंद्र उभारावे, अशी मागणी होत आहे. 

येत्या काही दिवसात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील. त्यानंतर गटविकास अधिकारींच्या अध्यक्षतेखाली पथक तयार करण्यात येतील. बोगस डॉक्‍टर यांची शोध मोहीम राबविण्यात येईल. पथक दर महिन्याला तपासणी करतील. 
 बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव. 
 
तपासणीचा आम्हास अधिकार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पथक तयार करून तपासणी होऊ शकते. बोगस डॉक्‍टर्सविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात येईल. 
 प्रकाश लोमटे, तालुका वैद्यकीय अधिकारी, चोपडा. 
 

Web Title: marathi news jalgaon docter