स्वादुपिंडानंतर आता छोट्या आतड्यांच्या प्रत्यारोपणाचे लक्ष्य : डॉ. गौरव चौबल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

शस्त्रक्रिया व प्रत्यारोपणाच्या क्षेत्रातील विख्यात तज्ज्ञ म्हणून डॉ. चौबल यांचा देशात लौकिक आहे. जळगावी रुग्ण तपासणीसाठी आले असता त्यांनी "सकाळ'शी दिलखुलास संवाद साधला. 

 जळगाव : बदलत्या जीवनशैलीमुळे पोटाचे विकार, यकृत निकामी होऊन त्यात बळी जाणाऱ्यांची संख्या वाढत असली, तरी आता आधुनिक तंत्रज्ञान, सुसज्ज यंत्रणा व तज्ज्ञांमुळे यकृत प्रत्यारोपण सहज शक्‍य झाले आहे. अशा सहाशेवर शस्त्रक्रिया यशस्वी केल्या असून त्यासोबत स्वादुपिंडाच्या प्रत्यारोपणाची राज्यातील पहिली शस्त्रक्रियाही यशस्वीपणे पार पाडली आहे. आता छोट्या आतड्यांच्या प्रत्यारोपणाची महाराष्ट्रातील पहिलीच शस्त्रक्रिया करण्यात येणार असून तीदेखील यशस्वी करू, असा विश्‍वास प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. गौरव चौबल यांनी व्यक्त केला. 

अवयवदान मोहिमेबाबत जनजागृती करण्यासह पोटाशी संबंधित विकार, त्यावरील शस्त्रक्रिया व प्रत्यारोपणाच्या क्षेत्रातील विख्यात तज्ज्ञ म्हणून डॉ. चौबल यांचा देशात लौकिक आहे. जळगावी रुग्ण तपासणीसाठी आले असता त्यांनी "सकाळ'शी दिलखुलास संवाद साधला. 

वैद्यकीय सेवेचा वारसा 
जळगावातील विख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. विश्‍वेश व रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल यांचे जावई असलेले डॉ. गौरव चौबल मूळचे मुंबईतले. पणजोबांपासून वैद्यकीय सेवेचा वारसा त्यांच्या घरात आहे. मुंबईतील केईएम हॉस्पिटल तथा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस केले. नंतर दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून अर्थात, "एम्स' (All Inida institue of medical sciences) जनरल सर्जरीतून एम.एस. सुवर्णपदकासह पूर्ण केले. "एम्स'मधूनच पुढे पोटाच्या शस्त्रक्रिया विषयात सुपरस्पेशलायझेशनसह पदवी प्राप्त केली. नंतर केईएमच्या जनरल सर्जरी विभाग, टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सेवा बजावली. टाटामधील सेवेनंतर अमेरिकेत ड्यूक विद्यापीठातून प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत विशेष फेलोशिप मिळवली.

क्‍लिक कराः  आई उभी राहली...अन्‌ चिमुकला खिडकीतून झाला गायब ! 
 

अवयव प्रत्यारोपण झाले सोपे 
अवयव प्रत्यारोपातील धोक्‍यांबाबत विचारले असता डॉ. चौबल म्हणाले, अलीकडच्या काळात कोणत्याही अवयवाचे प्रत्यारोप आधुनिक तंत्रज्ञान व सुसज्ज यंत्रणेसह तज्ज्ञांमधील कौशल्यामुळे सोपे झाले आहे. दरवर्षी तंत्रज्ञानात होणारे बदल व सुविधांची मुबलक उपलब्धता यामुळे अशा शस्त्रक्रिया काही प्रमाणात स्वस्त होत आहेत. 

महाराष्ट्रात प्रमाण वाढले 
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अवयव दानाबाबत अभियान प्रभावीपणे राबविले गेले. त्यासाठी जनजागृती व प्रचार- प्रसारही झाला. त्यामुळे गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात अवयव दानाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढले. गेल्या दोन एकट्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये यकृत (liver) व अन्य अवयव प्रत्यारोपणाच्या 110वर शस्त्रक्रिया झाल्याचे डॉ. चौबल म्हणाले. सुरवातीच्या काळात चेन्नई या शस्त्रक्रियांमध्ये आघाडीवर होते. आता मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नागपूर याठिकाणीही प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे चांगले केंद्र विकसित झाले आहेत. 

नक्की वाचा : घरी पोहचणार... तेवढ्यातच होत्याचे नव्हते झाले ! 
 

सहाशेवर शस्त्रक्रिया यशस्वी 
यकृत प्रत्यारोपण व त्यासंबंधीच्या सुमारे सहाशेवर शस्त्रक्रिया डॉ. चौबल यांनी यशस्वीपणे केल्या आहेत. त्याबाबत बोलताना डॉ. चौबल म्हणाले, गेल्या काही वर्षांत अवयव दानाबाबत जनमानसात बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. "ब्रेन डेड' रुग्णांचे अवयवदान करण्याबाबत व्यक्तिशः मी व आमचे सहकारी जनजागृतीची मोहीम राबवतोय. यकृत अथवा कोणत्याही अवयवाचे प्रत्यारोपण ज्या रुग्णावर केले जाते, तो त्याचा पुनर्जन्मच असतो. अशा शस्त्रक्रियातून 95 टक्के रुग्ण नैसर्गिक आयुष्य जगू शकतात, असा अनुभव आहे. परंतु, हे प्रमाण आणखी वाढले पाहिजे, असेही ते म्हणाले. 

स्वादुपिंडानंतर.. छोटे आतडे 
काही दिवसांपूर्वीच ज्युपिटरमध्ये आम्ही स्वादुपिंडाचे (Pancreas) प्रत्यारोपण यशस्वीपणे पूर्ण केले. महाराष्ट्रात अशाप्रकारचे प्रत्यारोपण प्रथमच झाले. या दोन शस्त्रक्रिया आम्ही पूर्ण केल्या असून येत्या काळात लवकरच छोट्या आतड्यांच्या (Small intestine) प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे "लक्ष्य' आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. 

यकृताची क्षमता अधिक त्यामुळे.. 
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे यकृतावर ताण पडून त्यासंबंधीचे आजार वाढले आहेत. फास्टफूड, जंकफूड, मद्याचे व्यसन यामुळे यकृत लवकर निकामी होती. मुळात, यकृताची शरीराला सपोर्ट करण्याची क्षमता अधिक असल्याने त्यावर कितीही ताण पडला, ते निकामी होत गेले तरी त्याची लक्षणे जाणवत नाही. 70-80 टक्के यकृत निकामी झाल्यानंतर लक्षणे जाणवू लागतात. मात्र, अशावेळी शस्त्रक्रिया अथवा प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे यकृत प्रत्यारोपणाबाबत योग्य वेळी निर्णय घेतलाच पाहिजे. तसेच यकृतावर ताण पडू नये यासाठी योग्य आहार, व्यायाम, व्यसनमुक्त राहणे गरजेचे आहे. 

असे आहे प्रमाण 
सध्या भारतात दर वर्षाला यकृत दान करणारे केवळ दोनशे दाते आहेत. वर्षभरात यकृत प्रत्यारोपणाच्या 1500 शस्त्रक्रिया होतात. त्यामुळे मागणी व उपलब्धता यातील फरक लक्षात येतो. अर्थात, यकृताच्या आजारांनी बळी जाणाऱ्यांची संख्या वर्षाला 20 हजारांपेक्षा अधिक आहे. यावरून अवयवदान चळवळ किती प्रमाणात रुजायला हवी, याचे महत्त्व लक्षात येते. 

आर्वजून पहा : गाढ झोपेत होती ती...अन्‌ असे घडले, की ती झोपेमध्येच गेली ! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon dr.Gavruv Chaubal arget of the small intestine transplant after pancreas