माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षक नियुक्‍ती देणारे रॅकेट? 

माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षक नियुक्‍ती देणारे रॅकेट? 

जळगाव ः माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना कायम पूर्ण अनुदानित मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात विशेष यंत्रणा काम करत आहे. खासगी शिक्षण संस्था चालकांसह विभागातील काही कर्मचारी मान्यता प्रस्तावांचे रॅकेट चालवत असल्याची बाब पुढे येत आहे. कमळगाव येथील पात्र शिक्षकाऐवजी दुसऱ्या उमेदवारांना मान्यता दिल्याच्या प्रकारावरून ही बाब समोर येत असून कमळगाव येथील प्रकरण मिटविण्यासाठी रात्रीतून सुनावणी लावल्यानंतर तक्रारदाराने हा प्रकार हाणून पडत शिक्षणाधिकाऱ्यांच्याच समोर सुनावणीची अट घातली आहे. 

कमळगाव (ता. चोपडा) येथील माध्यमिक शाळेत पात्र असलेल्या शिक्षकाऐवजी दुसऱ्याच शिक्षकाची नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबत संबंधित शिक्षकाने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन आवाज उठवल्याने कार्यालयात सुरू असलेला गैरप्रकाराचे बिंग बाहेर आले आहे. कमळगाव शाळेतील उपशिक्षक विनोद दोडे यांनी तक्रार दिल्यानंतर बुधवारी (ता. 30) रात्री तातडीने पत्र काढून आज (ता. 31) सकाळी अकराला तक्रारदार आणि संबंधित शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक यांना सुनावणीसाठी बोलाविण्यात आले होते. मुळात शिक्षणाधिकारी तीन दिवसांपासून कार्यालयात नसताना कार्यालयात परस्पर सुनावणी उरकण्यात आल्याचा प्रकार सुरू होता. याबाबत तक्रारदाराने शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्यासमोरच सुनावणी व्हावी, याचा आग्रह धरल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यावेळी शिक्षण विभागातील काही लिपीकांनी आणि मुख्याध्यापकांनी दुपारी हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. 

तो टेबल विशेष चर्चेत 
माध्यमिक शिक्षण विभागाकडे मान्यतेसाठी येणाऱ्या प्रस्तावांचे काम सांभाळण्यासाठी कलेक्‍शन टेबल ठेवण्यात आला आहे. माध्यमिक विभागात पूर्णवेळ काम करण्यासाठी जळगाव शहरातील एका शिक्षण संस्थाचालकाने काही माणसांची नियुक्ती केली आहे. मान्यता प्रस्तावांसंदर्भात हीच मंडळी निर्णय घेत असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. शंभर टक्के अनुदान असलेल्या जागेसाठी अडीच ते तीन लाख रुपये आणि 20 टक्‍क्‍यांपर्यंत मान्यता असलेल्या शिक्षक मान्यतेच्या आदेशासाठी एक ते दीड लाख रुपये घेतले जात असल्याचे या शिक्षकांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कलेक्‍शन टेबलप्रमाणे माध्यमिक शिक्षण विभागातील कलेक्‍शन टेबलवर देखील अनेक वर्षापासून एकच लिपिक ठाण मांडून आहे, हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com