षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा ... : एकनाथराव खडसे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 December 2019

नागपूर, दिल्ली येथून खडसे आज जळगावात आले. त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आपला पक्षावर अथवा केंद्रीय नेत्यांवर कोणताही रोष नाही. परंतु पक्षातील काही व्यक्तींवर राग आहे. ते पक्षात केवळ षडयंत्र रचत असतात.

जळगाव : पक्षासाठी मी गेली चाळीस वर्षे कार्य केले.. मात्र, सत्ता आल्यानंतर गेल्या चार वर्षांत आपल्या विरोधात केवळ षडयंत्र रचून विनाकारण छळण्यात आले. माझा पक्षावर अजिबात रोष नाही. परंतु, षडयंत्र करणारे चार ते पाच जण आहेत. त्यांची नावेही आपण तक्रारीत दिली आहेत. जर नेतृत्वाने त्यांच्यावर कारवाई केली तर आपण पक्षात राहू, अन्यथा चार ते पाच दिवसांत पक्षांतर करू, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 
नागपूर, दिल्ली येथून खडसे आज जळगावात आले. त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आपला पक्षावर अथवा केंद्रीय नेत्यांवर कोणताही रोष नाही. परंतु पक्षातील काही व्यक्तींवर राग आहे. ते पक्षात केवळ षडयंत्र रचत असतात. गेली चार वर्षे आपल्याविरुद्धही त्यांनी षडयंत्र रचून आपल्याला विनाकारण बदनाम केले. आपल्यावर आरोप करणे, आपल्या चौकशा लावणे, असा प्रकार केला. या लोकांविरुद्ध आपण तक्रार केली आहे. त्यांची नावेही तक्रारीत दिली असून, त्यासंबंधी सर्व पुरावेही दिले आहेत. त्यामुळे पक्षाने आता त्यांच्यावर कारवाई करावी. 

नक्‍की पहा > परीक्षा गिरीश महाजनांच्या नेतृत्वाची 

विखे चालतात.. मी का नाही? 
ज्यांच्यावर आपला रोष आहे, त्यांच्यासोबत काम कसे करणार? ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, अशा अन्य नेत्यांना पक्षात प्रवेश मिळतो, महत्त्वाचे स्थान मिळते. भाजपच्या मंत्र्यांना "ठग्स ऑफ महाराष्ट्र' म्हणणारे विखे- पाटील चालतात, शिवसेना-मनसेतून आलेले दरेकर चालतात.. मग, मला डावलण्याचे कारण काय? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

..अन्यथा पक्षांतर 
आपण आजही पक्षात असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, जर षडयंत्र रचणाऱ्या पक्षातील या लोकांवर कारवाई केली तर ठीक अन्यथा आपण आपला वेगळा निर्णय घेणार आहोत. येत्या चार ते पाच दिवसांत आपण पक्षांतर करणार आहोत. समर्थकांसह राज्यभरातील कार्यकर्त्यांचा आपल्यावर पक्षांतराचा मोठ्या प्रमाणात दबाव येत आहे. त्यामुळे आपल्याला निर्णय घ्यावाच लागणार आहे. 

पवार, ठाकरेंबरोबर राजकीय चर्चा 
नागपूर येथील नेत्यांच्या भेटीबाबत खडसे म्हणाले, होय.. मी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांना भेटलो. त्यांच्यासोबत अन्य कामांबरोबरच राजकीय चर्चाही केली. तीनही पक्षांनी पक्षात प्रवेश देण्याची तयारीही दर्शविली आहे. मात्र, अद्याप आपण निर्णय घेतलेला नाही. लवकरच कोणत्या पक्षात जायचे त्याचा निर्णय घेणार आहोत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknathrao khadse change party