परीक्षा गिरीश महाजनांच्या नेतृत्वाची 

परीक्षा गिरीश महाजनांच्या नेतृत्वाची 

भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या माध्यमातून भाजपने जळगाव जिल्ह्यात भक्कम पाय रोवले. दोन्ही लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखण्यात यश मिळविले, जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली. त्यानंतर महापालिकेवरही आपला झेंडा फडकविला. जिल्हा बॅंक, दूध फेडरेशनसह इतर सहकारी संस्थांवरही ताबा मिळविला. भाजपचे वर्चस्व मिळविण्यात एकनाथराव खडसे यांचा मोठा वाटा होता. मात्र त्यासोबत गिरीश महाजन यांचाही सहभाग होता. आता परिस्थिती बदलली, पक्षाची राज्यातील सत्ता गेली आहे. मित्रपक्ष शिवसेनाही सोबत नाही, तर एकनाथराव खडसे पक्षावर नाराज आहेत. अशा स्थितीत भविष्यात जिल्ह्यात भाजपपुढे वर्चस्व राखण्याचे आव्हान आहेच. पण सोबत पक्षाचे नेते गिरीश महाजनांची जिल्ह्यात पक्षीय नेतृत्व सिद्ध करण्याचीही परीक्षा आहे. 


भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती झाल्यानंतर जिल्ह्यात ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने रुजलेल्या शिवसेनेच्या मदतीने भाजपनेही आपले पाय रोवले. एकेकाळी शिवसेनेकडे तरुणांचा ओढा अधिक होता. त्यावेळी ग्रामीण भागात तर शिवसेनेच्या अनेक शाखा उघडल्या होत्या. त्या मानाने भारतीय जनता पक्षाचा शहरी तोंडवळा होता. मात्र, युती झाल्यानंतर ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपला शिवसेनेची साथ मिळाली. नंतर जिल्ह्यात युतीत शिवसेनेपेक्षा भाजपलाच अधिक फायदा झाल्याचे दिसून येत आहे. भाजपला फायदा होण्याचे कारण म्हणजे पक्षाला (कै.) उत्तमराव पाटील व त्यानंतर एकनाथराव खडसे, गिरीश महाजन यांचे नेतृत्व मिळाले. विरोधी पक्षात असताना खडसे यांनी आपल्या वक्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले आणि आपली एक वेगळी छाप पाडली होती. त्याच वेळी गिरीश महाजन यांनीही विविध आंदोलनाच्या माध्यमातून विरोधाची ताकद दाखविली होती. कापूस भाववाढीसाठी त्यांनी काढलेला मोर्चा तसेच त्यानंतर केलेले उपोषण गाजले होते. त्यातूनच पुढे पक्षाला ताकद मिळाली होती. 

भाजप सत्तेवर आल्यानंतर एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांना मंत्रिपद मिळाले. परंतु कालांतराने खडसे यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले. त्यानंतर जिल्ह्यात भाजपच्या अंतर्गत नेतृत्वाचा वाद सुरू झाला. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महाजन यांच्याकडे होते. तसेच राज्यातील पक्षाचे व सरकारचे "संकटमोचक' म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नगर, व जळगाव महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व आपोआपच महाजन यांच्याकडे आले. विधानसभा निवडणुकीतही उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी महाजन यांच्याकडेच होती. त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले. काही ठिकाणी अपयशही आले. परंतु, यावेळी युती असल्यामुळे शिवसेनाही सोबतीला होती. नाराज असले, तरी एकनाथराव खडसे यांनी पक्षासोबतच होते. 

निवडणुकीनंतर आता परिस्थिती बदलली आहे. मित्रपक्ष शिवसेना कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत सत्तेत गेली आहे. भाजप आज विरोधात आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार केल्यास पक्षाचे नेते एकनाथराव खडसे आजही पक्षावर नाराज आहेत. ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत भाजपची अवस्था बिकट आहे. आगामी काळात भाजपची परिस्थिती कशी असेल, याबाबत आता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही प्रश्‍न आहे. सत्तेच्या काळात पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व केले. परंतु, आता विरोधी पक्षात असताना पक्ष सांभाळण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने त्यांच्यावर आहे. शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडीचे एकत्र बळ आहे. या सोबतच खडसे नाराज असल्याने पक्षाला त्याचा फटका बसणार आहेत. अशा स्थितीत जिल्हा परिषदेवर सत्ता कायम राखण्याचे आव्हान आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या पालिका सांभाळण्याचेही आव्हान असणार आहे. जळगाव महापालिकेतही सत्ता बदलाचे वेध सुरू झाले आहेत. अशा स्थितीत पक्षात बळ राखून या सत्ता सांभाळण्यासाठी महाजन यांची परीक्षा आहे. शिवाय आगामी काळात जिल्हा बॅंक, दूध फेडरेशन या सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत. त्याही भाजपच्या ताब्यात ठेवण्याचे आव्हान आहे. भाजपच्या आता अंतर्गत निवडणुका होत आहे. त्यातच जिल्हाध्यक्षपदाचीही निवडणूक होणार आहे. त्यावेळीच पक्षात पदासाठी अंतर्गत वाद होणार नाही. याचीही दक्षता भाजपच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्षात काम करताना खऱ्या अर्थाने जिल्ह्यात वर्चस्व राखण्याचे पक्षासमोर आव्हान आहे. शिवाय नेतृत्व म्हणून गिरीश महाजन यांचीही आता खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com