सांगलीत सेनेने झिडकारले, जळगावात काय? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

जळगाव ः भारतीय जनता पक्ष, शिवसेना युती झाली पाहिजे. त्याबाबत आपण आशावादी आहोत, असे मत व्यक्त करणारे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला झिडकारत सेनेने सांगली महापालिका निवडणुकीत विरोधाचे आव्हान उभे केले. त्याच शिवसेनेने जळगाव महापालिकेत मात्र भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला भाजपतील बहुतांश नगरसेवकांचा विरोध आहे. अशा स्थितीत जळगावचे पालकमंत्री असलेल्या पाटलांकडे कार्यकर्ते आपली व्यथा मांडणार आहेत. त्यावर त्यांची भूमिका काय असणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

जळगाव महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील पक्ष, आघाडीला विरोध असतो. आताही खानदेश विकास आघाडी व शिवसेनेला भाजपचा विरोध आहे. अशा स्थितीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जैन यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, खाविआ आघाडीशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारतीय जनता पक्षातील बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्याचा त्याला विरोध आहे. त्यामुळे भाजपमध्ये जोरदार अंतर्गत वाद सुरू आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा युतीला विरोध आहे. मात्र, या "युती'ला मुख्यमंत्र्यांनीच हिरवा कंदील दाखविल्याचे सांगण्यात आल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. स्थानिक स्तरावर कार्यकर्ते विरोध करीत आहेत. मात्र, ही युती कोण करणार? आपल्या व्यथा कुणाकडे सांगाव्यात, असा प्रश्‍न युतीविरोधक कार्यकर्त्यांसमोर आहे. 

सांगली महापालिका निवडणुकीत भाजपचे नेतृत्वही चंद्रकांतदादा करीत आहेत. त्या ठिकाणी महापालिकेत भाजप-शिवसेना युती व्हावी, असा पाटील यांचा आशावाद होता. परंतु, शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी त्यांचा युतीचा प्रस्ताव साफ झिडकारला आणि आम्हाला भाजपसोबत युती नकोच, असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेना-भाजप आमनेसामने लढत आहेत. श्री. पाटील पालकमंत्री असलेल्या जळगाव महापालिकेत मात्र उलट स्थिती आहे. या ठिकाणी शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांनी युतीचा प्रस्ताव दिला आहे. भाजपकडून मंत्री महाजन त्यास अनुकूल आहेत. परंतु, कार्यकर्ते मात्र त्याला स्पष्ट नकार देत आहेत. त्यामुळे या ठिकाणी अंतर्गत तिढा निर्माण झाला आहे. आता जळगावातील युतीबाबत पालकमंत्री पाटील काय भूमिका घेतात, याकडे याकडेच कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. 

पालकमंत्री आज जळगावात 
खडसे यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यात खडसे व महाजन गटात वाद मिटविण्यासाठीच चंद्रकांत पाटील यांची जळगावच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाली. परंतु, जळगाव महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरू झालेल्या युतीच्या वादाबाबत पालकमंत्री म्हणून त्यांनी अद्याप तरी स्पष्ट मत व्यक्त केलेले नाही. पक्षात युतीबाबत अंतर्गत वाद सुरू असताना सांगलीच्या निवडणुकीत पाटील व्यस्त होते. त्यामुळे जळगावात त्यांनी लक्ष दिले नाही. मात्र उद्या (ता. 8) ते जळगावात येत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्याकडे "युती नकोच' अशी भूमिका मांडणार आहेत. त्यांच्याकडून तरी न्याय मिळेल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. 
 
Web Title: marathi news jalgaon election chandrakant patil