एक वर्षाची हमी देणारे अन्‌ तीस वर्षांत विकास केल्याचे सांगणारे थापाडे : गुलाबराव देवकर

gulabrao devkar
gulabrao devkar

जळगाव ः भारतीय जनता पक्षाची सध्या केंद्रात व राज्यात सत्ता आहे, तर शिवसेनेच्या नेतृत्वाची गेल्या तीस वर्षांपासून जळगाव महापालिकेत सत्ता आहे. दोघांकडे सत्ता असताना यांनी काहीही केलेले नाही. शिवसेनेचे नेते आम्ही मागे काय केले याचाच कित्ता सारखा गिरवत आहेत. गेल्या पंधरा वर्षांत काय केले ते सांगतच नाहीत, तर भाजपचे नेते आम्ही आगामी एका वर्षात जळगाव शहराचा कायपालट करणार आहोत, असे सांगतात. परंतु गेली चार वर्षे राज्यात सत्ता असताना यांनी शहरासाठी काय केले? ते सांगतच नाहीत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष थापाडेच आहेत. आन्ही राज्यात सत्तेत असताना शहरात बंदिस्त नाट्यगृह, लांडोरखोरी उद्यान विकास, मेहरुण तलावावर घाट बांधण्याचे काम केले. आम्हाला सत्तेची संधी दिल्यास निश्‍चितच जळगावकरांना विकास करून दाखवू, असा विश्‍वास माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 
जळगाव महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी केली आहे. दोन्ही पक्षांतर्फे 75 उमेदवार उभे केले आहेत. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे 48 उमेदवार रिंगणात आहेत. शहराच्या विकासाची हमी आम्ही देत आहोत. त्यामुळे आम्हाला सत्तेची संधी द्यावी, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. 

प्रश्‍न ः शिवसेना-भाजप नेते विकासाचे दावे करीत आहेत? 
उत्तर
ः दोन्ही पक्ष थापाडे आहेत. दोघांकडे सत्ता होती मात्र त्यांनी काहीही केलेले नाही. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महापालिकेत तीस वर्षांपासून सत्ता आहे. त्यांनी अगोदर काही कामे केली आहेत. मात्र, गेल्या पंधरा वर्षांत तर जळगावात विकासकामाची एकही वीट चढलेली नाही. जळगावकर मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. तरीही ते म्हणतात, की तीस वर्षांत आमच्याकडे विकासाचा आरसा आहे, तर भाजपकडे गेल्या चार वर्षांत केंद्रात व राज्यात सत्ता आहे. मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी 25 कोटी दिलेले आहेत. परंतु त्यातूनही ते विकास करू शकले नाहीत. आणि आता आम्ही एका वर्षात विकास करण्याची ते हमी देत आहेत. जनता या दोन्हीही थापाड्यांवर विश्‍वास ठेवणार नाहीत. 

प्रश्‍न ः शहरासाठी "राष्ट्रवादी'ने काय केले? 
उत्तर
ः राज्यात आमची सत्ता होती, मी पालकमंत्री होतो. मला कामाचा कमी कालावधी मिळाला. परंतु तेवढ्या काळातही आपण विकास निधी मंजूर करून आणून विकासाची कामे केली. बंदिस्त नाट्यगृहासाठी निधी आपण आणला. त्यानंतर मेहरुणच्या विकासासाठी आपण जिल्हा नियोजन मंडळातून निधी त्यातून मेहरुणला गणेश घाट उभारण्यात आला, लांडोरखोरी उद्यान भकास पडले होते. त्यासाठी निधी आणून त्याचा विकासही आपल्या कार्यकाळात झाला आहे. आमच्या केलेल्या कामाचा जनतेसमोर पुरावाच आहे. 

प्रश्‍न ः भाजप यशाचा दावा करीत आहे? 
उत्तर
ः भाजपकडे पैसा भरपूर आहे. त्यामुळे त्या जोरावर सर्व काही करू पाहत आहेत. नाशिक आणि जामनेर येथे त्यांनी तेच केले आहे. परंतु जळगावातही ते तेच करण्याच्या तयारीत आहेत. सन 2014 मध्येही त्यांनी असेच आश्‍वासन दिले होते. मात्र, जळगावचे नागरिक त्यांच्या या अमिषाला आणि भूलथापांना बळी पडणार नाहीत. 

प्रश्‍न : संकुल, वाघूर योजनांच्या विकासाचा दावा जैनांचा आहे? 
उत्तर
: सुरेशदादा जैन यांची ही जुनी कामे आहेत. परंतु प्रत्येक पंचवार्षिकला ते हीच आश्‍वासने देतात. गेल्या पंधरा वर्षांत महापालिकेवर तुमची सत्ता आहे. त्या काळातील एक तरी काम दाखवा. उगाच जनतेची फसवणूक करणे योग्य नाही. आता जनताही त्यांना फसणार नाही. 

प्रश्‍न ः गाळ्यांच्या प्रश्‍नाचे काय? 
उत्तर
ः महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांच्या जीवनाशी भाजप-शिवसेना दोन्हीही खेळ करीत आहेत. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. दोन्ही पक्षांनी बसून तातडीने त्याबाबत योग्य निर्णय घेतला असता तर हा सामंजस्याने सहज सोडविता आला असता. परंतु हा प्रश्‍न भिजत ठेवून गाळेधारकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जात आहे. 

प्रश्‍न ः कर्जमुक्तीचे काय? 
उत्तर
: विकासासाठी कर्ज घेणे आवश्‍यकच आहे. मात्र, त्याच्या फेडीचे नियोजन केले पाहिजे. दोन्ही पक्ष केंद्रात व राज्यात सत्तेत आहेत. त्यांनी त्याबाबत बैठक घेऊन आपल्या मंत्र्यांना सांगून असलेल्या अधिकारात सेंटलमेंट केली असती. परंतु याबाबतही दोन्ही पक्ष जनतेची दिशाभूल करीत आहेत. 

प्रश्‍न ः आपल्याकडून विकासाची हमी काय? 
उत्तर
ः जळगावकरांनी आम्हाला सत्तेची संधी दिल्यास आम्ही सर्वप्रथम महामार्गावरील समांतर रस्त्याचे काम करणार आहोत. खड्डेमुक्त रस्ता करण्यावर आमचा भर असेल. तसेच महापालिकेच्या उत्पन्नाचे अधिक स्त्रोत निर्माण करून त्या माध्यमातून कर्जफेड करण्याचा प्रयत्न असेल. याशिवाय दिवाबत्ती, साफसफाई व्यवस्थित करण्याकडे आमचे लक्ष असेल. व्यवसाय व उद्योगाच्या माध्यमातून जळगाव, औरंगाबाद, नाशिकच्या बरोबरीत आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com