"खाविआ'शी युतीचा निर्णय दोन दिवसांत घेणार : गिरीश महाजन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

जळगाव : शहराचा गेल्या पंधरा वर्षांपासून कोणताही विकास झालेला नाही. त्यामुळे महापालिकेवर भाजपची सत्ता आणि महापौर असावा, असे सर्वांचेच मत आहे. विकासासाठी खानदेश विकास आघाडी- शिवसेनेशी युतीची तयारी आहे. मुख्यमंत्र्यांनीही सहमती दर्शविली आहे. येत्या दोन दिवसांत जागावाटपाची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

भाजप कार्यालयात आज सायंकाळी पक्षाच्या मंडलप्रमुखांशी त्यांनी चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की गेल्या पंधरा वर्षांत शहरासाठी कोणताही निधी शहराला मिळालेला नाही. विकासासाठी भाजप हाच एकमेव पर्याय आहे. निश्‍चितच पक्षाला यश मिळणार आहे. त्यामुळे भाजप- शिवसेना- खानदेश विकास आघाडीशी युती करण्याचा प्रस्ताव आहे. महापौर भाजपचाच होईल. 

जागावाटपावर चर्चा 
युती अद्याप झाली नसल्याचे सांगून मंत्री महाजन म्हणाले, की भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येईल. तीत जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात येईल. पक्षाकडे इच्छुकांच्या आलेल्या अर्जांची प्रभागनिहाय माहिती घेऊन त्या जागांचा प्रस्ताव तयार करण्यात येईल. त्यानंतर हा प्रस्ताव खानदेश विकास आघाडीच्या नेत्यांना देण्यात येईल. जागावाटप योग्य झाल्यास युती करू. मात्र, ही सर्व प्रक्रिया दोन दिवसांत करण्यात येईल. 

खडसे आमचे नेतेच 
महापालिका निवडणूक भाजपचे स्थानिक आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येईल. एकनाथ खडसे हे आमचे नेते आहेतच. त्यांचे मार्गदर्शन या निवडणुकीसाठी घेण्यात येईल. त्यांचेच नेतृत्व असेल. 

"त्यांनी' "राष्ट्रवादी'ची चिंता करावी 
युतीची चर्चा करताना खडसे व आमदार भोळे यांना डावलले जात असल्याची टीका डॉ. सतीश पाटील यांनी केली होती. त्यासंदर्भात मंत्री महाजन म्हणाले, की सतीश पाटलांनी भाजपची चिंता करू नये. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन- चार नगरसेवक निवडून आणण्याची चिंता करावी. 
 
Web Title: marathi news jalgaon election khaviaa yuti girish mahajan