मराठा समाजाच्या मतांवरच विजयाचे गणित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

मुक्ताईनगर, निवृत्तीनगर, पिंप्राळा गाव, दांडेकरनगर, द्रौपदीनगर, अष्टभुजानगर असा हा प्रभाग क्र. 9 चा परिसर आहे. परिसरात पिंप्राळा गाव वगळता सर्वच नवीन वस्ती आहे. या प्रभागात एकूण 16 हजार 530 मतदान आहे. त्यात मराठा समाजाचे निम्मे म्हणजे तब्बल साडेनऊ हजार मतदान आहे. त्यामुळे त्या मतांवरच सर्व पक्षांनी विजयासाठी उमेदवाराचे गणित जुळविले आहे. माजी नगरसेवक चंद्रकांत ऊर्फ आबा कापसे स्वत: मैदानात नाहीत. मात्र, त्यांचे पुत्र मयूर व पत्नी प्रतिभा याच प्रभागातून मैदानात असून त्यांची कसोटी आहे. तर माजी नगरसेवक अमर ऊर्फ भागचंद जैन हेसुद्धा पुन्हा मतदारांचा कौल आजमावत आहेत.

मुक्ताईनगर, निवृत्तीनगर, पिंप्राळा गाव, दांडेकरनगर, द्रौपदीनगर, अष्टभुजानगर असा हा प्रभाग क्र. 9 चा परिसर आहे. परिसरात पिंप्राळा गाव वगळता सर्वच नवीन वस्ती आहे. या प्रभागात एकूण 16 हजार 530 मतदान आहे. त्यात मराठा समाजाचे निम्मे म्हणजे तब्बल साडेनऊ हजार मतदान आहे. त्यामुळे त्या मतांवरच सर्व पक्षांनी विजयासाठी उमेदवाराचे गणित जुळविले आहे. माजी नगरसेवक चंद्रकांत ऊर्फ आबा कापसे स्वत: मैदानात नाहीत. मात्र, त्यांचे पुत्र मयूर व पत्नी प्रतिभा याच प्रभागातून मैदानात असून त्यांची कसोटी आहे. तर माजी नगरसेवक अमर ऊर्फ भागचंद जैन हेसुद्धा पुन्हा मतदारांचा कौल आजमावत आहेत. महापालिकेच्या पहिल्या महापौरपदाच्या निवडीत महत्त्वाचे ठरलेले नगरसेवक मंगलसिंग पाटील यावेळीही "अपक्ष' आहेत. नवीन रचनेत या प्रभागात मोठी चुरस असल्याने जनतेचा कौल कुणाला मिळणार, याकडेच सर्वांचे लक्ष आहे. 
प्रभागात मराठा समाजाचे प्राबल्य आहेत. त्या खालोखाल राजपूत समाजाची मते आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाने उमेदवारी देताना समाजाचे गणित आखले आहे. गेल्या वेळी यावेळी या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेस चांगले प्राबल्य दिसून आले. तब्बल तीन नगरसेवक या भागातून निवडून आले होते. याच प्रभागातील नगरसेवक अमर ऊर्फ भागचंद मोतीराम जैन यावेळी शिवसेनेतर्फे निवडणूक लढवत आहेत. प्रभागातील संपर्क तसेच कामाच्या बळावर त्यांना विजयाची खात्री आहे. परंतु त्यांना चार उमेदवारांचे मोठे आव्हान आहे. त्यात अपक्ष उमेदवार रावसाहेब कडू पाटील हे संपर्काच्या बळावर उलटफेर करण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

कापसेंच्या पुत्राची कसोटी 
"अ' गटात राहुल सुरेश पाटील (शिवसेना), मयूर चंद्रकांत कापसे (भाजप), अशोक सीताराम पाटील (राष्ट्रवादी), तेजस रवींद्र सांळुखे (अपक्ष) अशी चौरंगी लढत आहे. माजी नगरसेवक चंद्रकांत ऊर्फ आबा कापसे यांचे पुत्र मयूर प्रथमच भाजपतर्फे निवडणूक मैदानात आहेत. आबा कापसे यांचा या प्रभागात चांगला संपर्क असून ते माजी नगरसेवकही आहेत. त्यामुळे त्यांचा त्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. शिवसेनेचे राहुल पाटील भाजपचे कार्यकर्ते आहेत. विशेषत: आमदार भोंळेचे ते कार्यकर्ते आहेत. मात्र, पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा या प्रभागात चांगला संपर्क आहे. त्यांचे मोठे आव्हान असणार आहे. "राष्ट्रवादी'चे अशोक सिताराम पाटील यांच्या पत्नी गेल्या वेळी खानदेश विकास आघाडीतर्फे निवडणूक रणागंणात होत्या. मात्र त्यां थोड्या मतानी पराभूत झाल्या. अशोक पाटील या प्रभागात चांगला संपर्कआहे. या शिवाय अपक्ष तेजस रवींद्र साळुंखे मैदानात आहेत. या प्रभागात सर्वच उमेदवार मराठा समाजाचे असल्याने कुणाला कौल मिळणार याकडे लक्ष आहे. 
 
नगरसेविका कापसेंची परीक्षा 
"ब' गटात सहा उमेदवार आहेत. त्यात नगरसेविका प्रतिभा कापसे यांची परीक्षा आहे. गेल्या वेळी त्या "राष्ट्रवादी'तर्फे निवडून आल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जनता त्यांना पुन्हा कौल देणार काय? याचीच परीक्षा आहे. शिवसेनेतर्फे उषा भास्कर पाटील यांची उमेदवारी आहे. गेल्या वेळी त्यांनी खानदेश विकास आघाडीतर्फे निवडणूक लढविली होती. कॉंग्रेसतर्फे हेमांगिनी प्रशांत फाळके यांची उमेदवारी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मनीषा संभाजीराव देशमुख यांची उमेदवारी आहे. त्यांचे पती संभाजीराव देशमुख सामाजिक कार्यकर्ते आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असल्याने त्यांच्या मतांमध्ये विघटन होण्याची शक्‍यता आहे, तर लताबाई पांडुरंग चौधरी, मनीषा नरेंद्र सोनवणे "अपक्ष' म्हणून निवडणूक लढवत आहेत. 

आजी, माजी नगरसेविकांची लढत 
"क' गटात मनीषा दत्तूसिंग पाटील (शिवसेना), प्रतिभा गजानन देशमुख (भाजप), दीपाली दुर्गेश पाटील (राष्ट्रवादी) हे उमेदवार असून त्यांच्यात काट्याची लढत होण्याची शक्‍यता आहे. मनीषा पाटील पिंप्राळ्याचे पोलिसपाटील विष्णू पाटील यांच्या स्नुषा आहेत. प्रतिभा देशमुख राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांचे पती गजानन देशमुख यांचा प्रभागात संपर्क चांगला आहे. त्यामुळे त्याचा फायदा देशमुखांना होण्याची शक्‍यता आहे. तर विद्यमान राष्ट्रवादीच्या नगरसेविका दीपाली दुर्गेश पाटील या पुन्हा याच प्रभागात नशीब आजमावत आहेत. नगरसेविका म्हणून केलेल्या कामाच्या बळावर त्या जनतेकडे पुन्हा कौल मागत आहेत. या लढतीत कुणाला यश मिळणार, याकडेच लक्ष आहे. 

अमर जैनांना पुन्हा संधी? 
"ड' गटात भागचंद ऊर्फ अमर मोतीलाल जैन (शिवसेना), विजय पुंडलिक पाटील (भाजप), नारायण गोविंदा पाटील (राष्ट्रवादी), मंगलसिंग उदयसिंग पाटील (अपक्ष), रावसाहेब कडू पाटील (अपक्ष) असे पाच उमेदवार मैदानात आहेत. विद्यमान नगरसेवक अमर जैन या भागातीलच आहेत. त्यांचा या भागात संपर्क चांगला आहे. तसेच आपल्या कामाच्या बळावर या भागातून नशीब आजमावत आहेत. त्यामुळे जनता त्यांना पुन्हा संधी देईल का? याकडेच लक्ष आहे. नारायण गोविंदा पाटील हे राष्ट्रवादीतर्फे मैदानात आहेत. ते सामाजिक कार्यकर्ते असून, त्यांनी सन 1992 मध्ये शिवसेनेतर्फे निवडणूक लढविली. त्यानंतर मात्र त्यांनी सामाजिक कार्यच केले. यावेळी ते मैदानात आहेत. माजी अपक्ष नगरसेवक मंगलसिंग पाटील पुन्हा मैदानात आहेत. विजय पाटील व नारायण पाटील यांना प्रभागात मराठा मतदान मोठ्या संख्येने असल्याने विजयाची अपेक्षा आहे. 

Web Title: marathi news jalgaon election maratha samaj vote