निष्ठावंतांची नाराजी दूर, ते प्रचारात सक्रिय : रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

जळगाव : बेरजेचे राजकारण करताना अन्य पक्षांतील काही लोकांना पक्षात प्रवेश द्यावा लागतो. त्यामुळे पक्षातील काही निष्ठावंत नाराज होतात. तसे जळगावातही झाले असेल. मात्र, त्यांची नाराजी दूर करून त्यांना प्रचारात सहभागी करुन घेतले आहे. संघटनेच्या बळावर भाजप जळगावसह सांगली महापालिकाही ताब्यात घेईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. 

जळगाव : बेरजेचे राजकारण करताना अन्य पक्षांतील काही लोकांना पक्षात प्रवेश द्यावा लागतो. त्यामुळे पक्षातील काही निष्ठावंत नाराज होतात. तसे जळगावातही झाले असेल. मात्र, त्यांची नाराजी दूर करून त्यांना प्रचारात सहभागी करुन घेतले आहे. संघटनेच्या बळावर भाजप जळगावसह सांगली महापालिकाही ताब्यात घेईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. 
महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जळगावात आले असता सायंकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे यावेळी उपस्थित होते. श्री. दानवे म्हणाले, की गेल्या चार वर्षांत आम्ही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये संघटनेच्या बळावर चांगले यश मिळविले. जळगाव जिल्हा तर भाजपसाठी आदर्श जिल्हा मानला जातो. त्यामुळे जळगाव महापालिकेची निवडणूकही आम्ही मोठ्या फरकाने जिंकू, महापालिकेत आमचे पन्नासपेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील. 

निष्ठावंतांची नाराजी दूर 
निष्ठावंतांना डावलण्यात आल्याच्या प्रश्‍नावर दानवे म्हणाले, की काही वेळा अन्य पक्षांतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात स्थान द्यावे लागते. अशा वेळी निष्ठावंत नाराज होणे स्वाभाविक आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देताना काहींची नाराजी झाली असली, तरी ती दूर केली आहे. ते प्रचारात सहभागी असून पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी अहोरात्र झटत आहेत. कार्यकर्त्यांच्या या संघटनशक्तीच्या जोरावर आम्ही महापालिका ताब्यात घेऊ. जळगावसह सांगली महापालिकेवरही भाजपचाच झेंडा फडकेल. आमदार सुरेश भोळे, हरिभाऊ जावळे, उन्मेष पाटील, स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, ललित कोल्हे, दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते भाजपच्या महापालिका निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. 

"नुरा कुस्ती'चा प्रश्‍नच नाही 
भाजप-शिवसेनेतील लढतीला विरोधक "नुरा कुस्ती' म्हणत असल्याबाबत दानवे यांनी त्याचा इन्कार करत आम्ही 50 पेक्षा अधिक जागांचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व 75 जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे "नुरा कुस्ती'चा प्रश्‍नच नाही. निवडणुकीनंतरही युतीचा प्रश्‍नच उद्‌भवणार नाही. कारण आमची स्वबळावर सत्ता येईल, असे सांगितले

Web Title: marathi news jalgaon election prachar ravsaheb danve