असे उमेदवार... असा प्रभाग - सिंधी, लेवा पाटील समाजाचा प्रभाव 

असे उमेदवार... असा प्रभाग - सिंधी, लेवा पाटील समाजाचा प्रभाव 

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 25 व 26 असलेला हा भाग आता नवीन रचनेत प्रभाग क्रमांक सोळा झालेला आहे. रचना कॉलनी, एकता नगर, सालार नगर, नाथवाडा, ढाकेवाडी, हाजी अहमदनगर, जुनी जोशी कॉलनी, मासुमवाडी, नवालनगर, सम्राट कॉलनी, पवननगर असा हा परिसर आहे. या प्रभागात एकूण 21 हजार मतदान आहे. यात सिंधी आणि लेवा पाटील समाजाचा प्रभाव आहे. विद्यमान नगरसेवक चेतन शिरसाळे (शिवसेना) आणि माजी नगरसेवक भगत बालाणी (शिवसेना )यांची प्रमुख लढत आहे. तर खुबचंद साहित्या व त्यांच्या मातोश्रीही या मतदार संघातून कौल आजमावत आहेत. 

आजी माजी नगरसेवक लढत 
प्रभागातील "अ"गटात विद्यमान नगरसेवक विरुद्ध माजी नगरसेवक अशी लढत आहे. विद्यमान नगरसेवक चेतन शिरसाळे शिवसेनेतर्फे उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपतर्फे माजी नगरसेवक भगत बालाणी व माजी नगरसेविका आशा शांताराम सूर्यवंशी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवडणूक मैदानात आहेत. तर कॉंग्रेसतर्फे मनोज डिंगबर चौधरी निवडणूक लढवीत आहेत. गटातील चेतन शिरसाळे यांचा प्रभागात चांगला प्रभाव आहे. त्यांच्या घरातील वडील, भाऊ व ते स्वतः याच प्रभागातून नगरसेवक निवडून आले आहेत. तर माजी नगरसेवक भगत बालाणीही याच प्रभागातून निवडून आले आहेत. गेल्या वेळी त्यांच्या भावजय स्नेहा प्रकाश बालाणी या प्रभागात भाजपतर्फे निवडून आल्या होत्या. यावेळी भगत बालाणी मैदानात आहेत. बालाणी हे सन 1992 मध्ये प्रथम भाजपतर्फे निवडून आले होते. त्यानंतर सतत तीन टर्म ते नगरसेवक होते. याच गटात माजी नगरसेविका आशा शांताराम सूर्यवंशी या खानदेश विकास आघाडीतर्फे निवडून आल्या होत्या. गेल्यावेळी त्या पराभूत झाल्या होत्या, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे त्या निवडणूक लढवीत आहेत. तर कॉंग्रेसतर्फे मनोज डिगंबर चौधरी मैदानात आहेत. 

"ब'गटात चौरंगी लढत 
प्रभागातील "ब'गटात चौरंगी लढत होत आहेत. यात रजनी प्रकाश अत्तरदे(भाजप), प्रिया अमोल कोल्हे( राष्ट्रवादी), पारूबाई रामदास मोरे (अपक्ष) साधना प्रदीप श्रीश्रीमाळ (शिवसेना) या उमेदवार रणांगणात आहेत. रजनी अत्तरदे या भुसावळ पालिका राजकारणातील सक्रिय असलेले चंद्रशेखर अत्तरदे यांच्या मातोश्री आहेत. त्यांच्या पत्नी माधुरी अत्तरदे भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. प्रिया कोल्हे याचे पती अमोल कोल्हे व्यावसायिक आहेत. साधना श्रीश्रीमाळ यांचे पती प्रदीप श्रीश्रीमाळ यांचा टेन्ट हाऊसचा व्यवसाय आहे. ते बी. जे. मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्षही होते. या प्रभागातील चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

नगरसेविकांची स्नुषाची लढत 
"क'गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यमान नगरसेविका शालिनी काळे यांच्या स्नुषा रेश्‍मा कुंदन काळे भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवीत आहेत. शालिनी काळे यांच्या कार्यावर स्नुषा रेश्‍मा विजयाची अपेक्षा आहे. तर शिवसेनेतर्फे बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्या मातोश्री जानकीबाई साहित्या निवडणूक लढवीत आहेत. साहित्या याचा या प्रभागात जनसंपर्काचा त्यांना फायदा होण्याची अपक्षा आहे. कॉंग्रेसतर्फे रेखा सिद्धार्थ भालेराव यांची उमेदवारी आहे. त्यांचे पती सिद्धार्थ भालेराव निवृत्त आहेत. व अपक्ष सुरेखा संजय तायडे निवडणूक लढवीत आहेत. 

खुबचंद साहित्यांची कसोटी 
"ड'गटात बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या शिवसेनेतर्फे निवडणूक लढवीत आहेत. साहित्यांचा या प्रभागात चांगला संपर्क आहे त्याच बळावर त्यांना विजयाची आशा आहे. तर भाजपतर्फे मनोज नारायणदास अहुजा मैदानात आहेत. त्यांचा मोबाईल विक्रीचा व्यवसाय आहे. ते माजी आमदार गुरुमुख जगवानी यांचे स्नेही आहेत. तसेच त्यांचा प्रभागात संपर्कही आहे. कॉंग्रेसतर्फे भरत दिलीप बाविस्कर मैदानात आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सुरेशकुमार चंदूमल कुकरेचा मैदानात आहेत. त्यांचाही मोबाईल विक्रीचा व्यवसाय आहे. तर समाजवादी पक्षातर्फे मोहम्मद इक्‍बाल अब्दुल सत्तार, हिंदुमहासभेतर्फे खुशाल तिलकराज शर्मा, अपक्ष सचिन अशोक जोशी, संजय सोना तायडेही रिंगणात आहेत. गटात आठ उमेदवार असून जनता कुणाला कौल देणार याकडेच लक्ष आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com