निवडणुकीतील आर्थिक बळ फार काळ टिकणारे नाही : किरण बोंडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

जळगाव : निवडणुकीतील आर्थिक उलाढालीचे बळ वाढले आहे. त्यात यश मिळते आणि आजच्या लोकशाहीने स्वीकारलेच आहे, असे म्हटले जाते. मात्र तरीही ते फार काळ टिकणार नाही. त्यामुळे पराभव झाला तरी संघर्ष करायलाच पाहिजे. बदलत्या काळात एक दिवस यश नक्कीच मिळणार, असा विश्‍वास प्रभाग 11 (ब) मधील पराभूत अपक्ष उमेदवार किरण संजय बोंडे यांनी व्यक्त केला. 

जळगाव : निवडणुकीतील आर्थिक उलाढालीचे बळ वाढले आहे. त्यात यश मिळते आणि आजच्या लोकशाहीने स्वीकारलेच आहे, असे म्हटले जाते. मात्र तरीही ते फार काळ टिकणार नाही. त्यामुळे पराभव झाला तरी संघर्ष करायलाच पाहिजे. बदलत्या काळात एक दिवस यश नक्कीच मिळणार, असा विश्‍वास प्रभाग 11 (ब) मधील पराभूत अपक्ष उमेदवार किरण संजय बोंडे यांनी व्यक्त केला. 
किरण बोंडे यांच्या परिवारात निवडणूक लढविण्याची ही सहावी टर्म आहे. त्यांच्या परिवारात पती, सासू, दीर आणि त्यांनी स्वत: महापालिकेची दोन वेळा निवडणूक लढविली आहे. प्रत्येक वेळी पराभव झाला म्हणून या परिवारातील कोणीही खचले नाही, नव्या उमेदीने ते लढले आहेत. या वेळी किरण बोंडे या प्रभाग 11 (ब) मधून अपक्ष उमेदवार होत्या. त्यांचे प्रतिस्पर्धी बलाढ्य उमेदवार होते. तरीही त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी प्रभागात जोरदार प्रचार केला. त्यांना 1 हजार 125 मते मिळाली आहेत. मात्र पराभव झाला तरीही त्या खचलेल्या नाहीत. नव्या उमेदीने लढण्याची त्यांची तयारी आहे. त्यांचे शिक्षण बी. ए. झालेले आहे. त्यांनी "बेकरी अँन्ड कन्फेशनरी'चा डिप्लोमा केला आहे. त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. शिवाय ग्राफिक डिझायनर म्हणूनही त्या काम करतात. त्यांचे पती संजय बोंडे यांना त्या व्यवसायात मदत करतात. 
निवडणुकीतील पराभवाबाबत त्या म्हणतात, निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचा आरोप होत आहे आणि तो खरा आहे. परंतु जर ही उलाढाल होतच आहे, तर लोकशाहीने ती स्वीकार केली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. त्यामुळे हा प्रकार होणार आहेच. हे धरून राजकारणात सामना करण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र स्वीकारलेच पाहिजे कारण पैशावरचे राजकारण फारकाळ टिकत नाही. हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. अगदी अनेक वर्षे राज्य करणाऱ्या कॉंग्रेसलाही पराभूत व्हावेच लागले आहे. तर ज्यांचे दोन सदस्य होते तेच भाजप आज बहुमतात आहे. त्यामुळे एक दिवस आपल्याला यश येईलच हे लक्ष्य ठेवून चालले पाहिजे. 

सामाजिक कार्य सुरूच ठेवणार 
पराभव झाला म्हणून लढणे थांबवू नये, अगदी राजकारणातही तेच सूत्र आहे. त्यामुळे आम्ही बोंडे परिवार या सूत्रावर ठाम आहोत. त्यामुळे आमचा लढा सुरू राहणार आहे. शिवाय आम्ही आमचा चरितार्थ चालवून जेवढे शक्‍य होईल ते सामाजिक कामही आम्ही जनतेसाठी सुरूच ठेवणार आहोत. एक दिवस आम्हाला यश मिळेलच, जनता आम्हाला स्वीकारेल याची खात्री आहे. सुशिक्षित युवकांनीही राजकारणात जरूर यायला हवे. "आपले ते काम नाही' असे न म्हणता आपण समाजाच काही देणं लागतो या लोकसेवेच्या हेतून या क्षेत्राकडे पाहिल्यास भविष्यात राजकारणातही बदल घडून येईल, हे निश्‍चित.

Web Title: marathi news jalgaon election young palitical kiran bonde