इंधन दरवाढीचा ट्रान्स्पोर्टचालकांना धसका 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 मे 2018

इंधन दरवाढीचा ट्रान्स्पोर्टचालकांना धसका 

जळगाव : इंधनाचे दर दररोज वाढत असताना त्या तुलनेत मालवाहतुकीच्या फेरीचा दर वाढत नाही, त्यामुळे वाहतूकदारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. सहा महिन्यांपूर्वी ट्रकच्या फेरीनिहाय जेवढे दर होते, तेच आजही कायम आहे. या वाढत्या इंधन दरवाढीचा ट्रकच्या फेऱ्यांवर परिणाम होऊन व्यवसाय कमी होण्याचा धसकाही वाहतूकदारांनी घेतला आहे. वाहतूक फेऱ्यांचे दर वाढत नसले तरी इंधन दरवाढीच्या नावाखाली महागाई वाढण्याची शक्‍यता यामुळे बळावत आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. सद्य:स्थितीत जळगावात पेट्रोलचा दर 85 तर डिझेलही 74 वर पोचले आहे. त्यामुळे सामान्य वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे शहरासह जिल्ह्यात ट्रान्स्पोर्ट व्यवसायही या दरवाढीने अडचणीत आला आहे. 

जिल्ह्यात सातशे वाहतूकदार 
जळगाव शहरात तीनशे तर सावदा, रावेर, भुसावळ, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव आदी मोठ्या तालुक्‍यांमध्ये चारशे असे जवळपास सातशे वाहतूकदार जिल्ह्यात आहेत. या वाहतूकदारांच्या माध्यमातून जिल्ह्यांतर्गत तसेच राज्यातील मोठ्या शहरांमध्ये, राज्याबाहेर जवळपास सर्वच प्रांतांमध्ये सुमारे पाच हजार ट्रकच्या माध्यमातून मालवाहतूक होत असते. तर परराज्यातूनही जळगावात येणाऱ्या ट्रकची संख्या तीनशे प्रतिदिन एवढी आहे. 

या मालाची वाहतूक सर्वाधिक 
शहरातून पीव्हीसी पाइप, ठिबकच्या नळ्या, इरिगेशनचे साहित्य, चटई, डाळी, खाद्यतेल या वस्तूंची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. तर रावेर, सावदा भागातून केळीची वाहतूक होत असते. दिवसभरात शहरासह जिल्ह्यात ट्रान्स्पोर्ट व्यवसायात सुमारे 40 लाखांची उलाढाल होते. त्यावर 700 वाहतूकदार, त्यांच्याकडील कर्मचारी व हमाल असा 15 हजारांवर जणांना रोजगार उपलब्ध होतो. 
------ 

अशा आहेत अडचणी 
इंधन दरवाढीने वाहतूक खर्च वाढला आहे. तुलनेने फेऱ्यांचे दर वाढलेले नाहीत. वर्षभरापूर्वी दिल्लीसाठी ट्रकच्या एका फेरीस 40 हजार रुपये मिळायचे, तेव्हा डिझेलचा दर 62 रुपये होता, आज 74 आहे, तरीही फेरीचा दर तेवढाच आहे. अर्थात, गाड्यांच्या उपलब्धतेवरही हा दर अवलंबून असतो. कमी दरात आता ट्रकचालकही फेरी नेण्यास तयार नसतात, त्यामुळे व्यवसायच अडचणीत आल्याचे वाहतूकदार सांगतात. 
----- 
 
बाजारपेठ मात्र मोकाट 
इंधन दरवाढीचा थेट वाहतुकीच्या दरावर परिणाम झालेला नसला तरी वाहतूकदारांचा खर्च वाढला आहे, हे निश्‍चित. मात्र, इंधन दरवाढीचे नाव वापरून बाजारपेठेतील सर्वच वस्तूंचे दर वाढविण्यास व्यावसायिक मोकाट असतात. जर वाहतूक फेऱ्यांचे दर वाढत नसतील तर बाजारातील वस्तूंचे दर का वाढविले जातात? असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो. 
------- 

इंधन दरवाढीने वाहतूक खर्च वाढला आहे. मात्र मालवाहतुकीच्या फेऱ्यांचा दर खूप वाढलेला नाही. मोठ्या शहरांमधील व अन्य ठिकाणच्या मालवाहतुकीचे फेरीनिहाय दर वर्षभरापूर्वी जेवढे होते, तेवढेच आहेत. इंधनाचे दर कमी झाल्यास थोडा दिलासा मिळू शकेल, त्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत. 
- पप्पूशेठ बग्गा (अध्यक्ष, जिल्हा ट्रान्स्पोर्ट संघटना) 
-------------- 
 
Web Title: marathi news jalgaon endhan