1 मे पासून होणार कपाशी बियाण्यांची विक्री ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

कापूस उत्पादकांच्या बैठकीत 25 मे 2020 पासून कपाशीच्या बियाण्यांची विक्री करण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, कोरोना आपत्तीमुळे सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने यंदा बियाणे पाकिटांची विक्री ही आधीपासून करावी; अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिक्षक संभाजी ठाकूर व श्री. भोकरे यांच्याकडे केली होती.

जळगाव : कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमिवर, राज्य शासनाने 1 मे पासून कपाशीच्या बियाण्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेला पाठपुरावा महत्वाचा ठरला आहे. यामुळे उन्हाळी लागवड करणाऱ्या कापूस उत्पादकांना लाभ होणार आहे. तर बियाण्यांचा तुटवडा भासू देणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. 

हेपण वाचा - कापूस खरेदीकडे सीसीआयचे दुर्लक्षच

शेतकऱ्यांनी केली होती मागणी 
यावर्षी 14 फेब्रुवारीला झालेल्या कापूस उत्पादकांच्या बैठकीत 25 मे 2020 पासून कपाशीच्या बियाण्यांची विक्री करण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु, कोरोना आपत्तीमुळे सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने यंदा बियाणे पाकिटांची विक्री ही आधीपासून करावी; अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिक्षक संभाजी ठाकूर व श्री. भोकरे यांच्याकडे केली होती. त्यांनी राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हा प्रश्‍न सोडविण्याचे सांगितले होते. याबाबत पालकमंत्री पाटील यांनी कृषी मंत्र्यांशी चर्चा करून 1 मे पासून कापूस बियाणे विक्री करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने ही मागणी मान्य करण्यात आली असून यंदा 1 मे पासून शेतकऱ्यांसाठी कपाशीचे बियाणे उपलब्ध करण्यात येणार आहेत. 

शेतकऱ्यांची फसवणूक टळणार 
जळगाव जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र खूप मोठे आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 5 लाख 7 हजार 583 हेक्‍टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली होती. गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा उन्हाळी लागवड होणार असून एकंदरीत कपाशीच्या लागवडीच्या क्षेत्रातही वाढ होणार असल्याचे स्पष्ट आहे. यंदा जिल्ह्यात सुमारे 5 लाख 10 हजार 755 हेक्‍टर क्षेत्रावर कापूस लागवड होण्याची शक्‍यता आहे. यातील पाच लाख पाच हजार 364 हे बीटीचे तर 7 हजार 691 हेक्‍टर हे नॉन-बीटीचे क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे. यासाठी 25 लाख 53 हजार 775 बियाण्यांचे पाकिटे लागणार असून यात 25 लाख 15 हजार 319 इतके बीटी-2 तर 38 हजार 456 नॉन-बीटी बियाण्यांची पाकिटे असतील. नेहमी प्रमाणे मे अखेरीस बियाण्यांची पाकिटे उपलब्ध केल्यास शेतकरी आधीप्रमाणेच अन्य जिल्ह्यांमधून बियाणे खरेदी करतील व यात त्यांची फसवणूक होण्याची शक्‍यता आहे. राज्याच्या कृषी आयुक्तांनी राज्यातील सर्व कृषी सहसंचालकांना पत्राद्वारे याची माहिती दिली आहे. 

काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई : पालकमंत्री पाटील 
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांना यंदा 1 मेपासून कपाशीची बियाणे उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना बियाण्यांचा तुटवडा होऊ देणार नसल्याची ग्वाही ना. पाटील यांनी दिली आहे. तर बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon farmer cotton seeds packet 1st may avalable