पाचशे उद्योगांची चाके रुळावर...पंधरा हजारांवर कामगार आपापल्या कामावर! 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 मे 2020

"लॉकडाउन' जारी असताना बंद उद्योग सुरू करण्यासाठी प्रशासनाने ऑनलाइन परवानगीची सुविधा उपलब्ध करून दिली, तसेच या उद्योगांमधील कामगारांना प्रवास परवाना (ट्रॅव्हल पास) उपलब्ध करून देणे सुरू केले.

जळगाव  : "लॉकडाउन'च्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात बंद असलेले येथील "एमआयडीसी'तील सुमारे पाचशे उद्योग आता तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात सुरू झाले आहेत. या उद्योगांची चाके रुळावर येत असताना, त्यातील पंधरा हजार कामगारही आपापल्या कामावर रुजू झाल्याने औद्योगिक वसाहतीतील गजबज पूर्ववत होताना दिसत आहे. 

आर्वजून पहा : जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आलेख वाढतोय 

"कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात 24 मार्चपासून "लॉकडाउन' सुरू करण्यात आले. नंतर ते 14 एप्रिल ते 3 मे असे दुसऱ्या टप्प्यात, 3 ते 17 मे या तिसऱ्या टप्प्यासाठी आणि आता 17 ते 31 मेपर्यंत चौथ्या टप्प्यात वाढविण्यात आले. या "लॉकडाउन'च्या काळात जीवनावश्‍यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग वगळता सर्व उद्योग- व्यवसाय बंद करण्यात आले होते. "लॉकडाउन'चा दुसरा टप्पा झाल्यानंतर काही प्रमाणात उद्योग सुरू करण्यात सवलती देण्यात आल्या. तिसऱ्या "लॉकडाउन'नंतर त्यात आणखी शिथिलता आली. 

क्‍लिक कराः तरुणाने "कोरोना'वर केली मात... दहाच दिवसांत "ओके',  पुष्पवृष्टीने स्वागत 
 

पाचशे उद्योग सुरू 
"लॉकडाउन' जारी असताना बंद उद्योग सुरू करण्यासाठी प्रशासनाने ऑनलाइन परवानगीची सुविधा उपलब्ध करून दिली, तसेच या उद्योगांमधील कामगारांना प्रवास परवाना (ट्रॅव्हल पास) उपलब्ध करून देणे सुरू केले. उद्योग सुरू करण्यासाठी आवश्‍यक त्या मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या. आतापर्यंत शहरातील सुमारे पाचशे उद्योजकांनी ऑनलाइन अर्ज करून उद्योग सुरू करण्यासंबंधी परवानगी मिळविली आहे. या उद्योगांमधील नऊ हजार 270 कामगारांना ऑनलाइन प्रवास परवाना उपलब्ध करून देण्यात आला आहे; तर जैन इरिगेशन व सुप्रीमसारख्या मोठ्या कंपन्यांमधील सुमारे साडेचार ते पाच हजार कामगारांना "ऑफलाइन' परवाना देण्यात आला आहे. या उद्योगांची चाके रुळावर येत असताना "एमआयडीसी'त आता गजबज सुरू झाली आहे. असे असले तरी अद्याप सातशे ते आठशे उद्योग सुरू व्हायचे आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon five hundred Industry start, Fifteen thousand workers start to work