बोगस डॉक्‍टरांवर "आयएमए'ची राहणार नजर : नूतन अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

जळगाव ः डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यात बऱ्याचदा गैरसमज निर्माण होत असतात. ते दूर करण्यासाठी गेल्या वर्षी नेमलेल्या समितीद्वारे समेट घडवून आणत आहे. परंतु बऱ्याचदा डॉक्‍टरांचीही चूक असते. जर डॉक्‍टरांची चूक असेल, तर त्यांना "आयएमए' पाठीशी घालणार नाही. शिवाय खोट्या पदव्या घेऊन प्रॅक्‍टीस करणाऱ्या बोगस डॉक्‍टरांवरही "आयएमए'ची नजर राहील, अशी स्पष्ट भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशन जळगावचे नूतन अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी यांनी "सकाळ'शी बोलताना मांडली. 

इंडियन मेडिकल असोसिएशन जळगावची नूतन कार्यकारिणी नुकतीच घोषित झाली. या कार्यकारिणीतील पदाधिकारी उद्यापासून (1 एप्रिल) जळगाव "आयएमए'चे कामकाज सांभाळणार असून, त्यांचा पदग्रहण सोहळा सहा एप्रिलला होणार आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ. जोशी यांनी भूमिका मांडताना सांगितले, की "आयएमए' ही राष्ट्रीयस्तरावर काम करणारी संस्था असून, प्रामुख्याने डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी जळगाव "आयएमए'ने गेल्या वर्षीच डॉक्‍टर, वकील आणि रुग्ण यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली आहे. या समितीकडे रुग्णांच्या काही तक्रारी असल्यास त्या मांडून त्यांचे ऐकून घ्यावे आणि शंकांचे निरसन करण्याचे काम सुरू आहे. 

डॉक्‍टरांची "इमेज' सुधारण्यासाठी प्रयत्न 
डॉक्‍टरांशी संबंधित असलेली संस्था असून, त्यादृष्टीने काम करत असतो. आजच्या स्थितीत कळत-नकळत डॉक्‍टरांची समाजात असलेली "इमेज' खराब होत चालली आहे. सर्वच डॉक्‍टर चुकीच्या पद्धतीने वागतात असे नाही; तर काही ठराविक डॉक्‍टरांमुळे सर्व डॉक्‍टरांना नागरिकांनी एकाच पक्‍तीत बसवून सर्वच चुकीचे वागतात, असा समज केला आहे. त्यामुळे डॉक्‍टरांची समाजातील "इमेज' खराब झाली आहे. पूर्वीप्रमाणे ही "इमेज' कशी सुधारेल? यासाठी "आयएमए' निश्‍चितच प्रयत्नशील असेल. याचकरिता पदग्रहण सोहळ्यास मेळघाटमध्ये गेल्या 18-20 वर्षांपासून लोकांमध्ये जाऊन कशी सेवा देतात याची जाण होण्यासाठी डॉ. आशिष सातव यांचे मार्गदर्शन ठेवले आहे. 

ऑगस्टमध्ये विशेष कार्यशाळा 
डॉक्‍टर आज विविध समस्यांमध्ये आहेत. यामध्ये प्रामुख्याने डॉक्‍टर आणि रुग्णातील संवाद हरपला आहे. हा संवाद सुधारण्याच्या दृष्टीने "आयएमए' जळगावतर्फे ऑगस्टमध्ये संवाद चांगला करण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.

Web Title: marathi news jalgaon froad docter IMA watch dr joshi