बोगस मतदारांनी हिरावला मतदानाचा अधिकार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

जळगाव : मेहरुण परिसरात असलेल्या विश्‍वकर्मानगर भागातील प्रभाग 14 मध्ये एका महिलेच्या नावाने, तर या. दे. पाटील शाळेच्या केंद्रावर एका नवमतदाराच्या नावाने बोगस मतदान झाले. दोन्ही प्रकरणात दोन वेगवेगळ्या तक्रारी करण्यात आल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेला मतदान करण्यास परवानगी दिली, तर तरुणाला मतदान करण्यास नकार देत पोलिसांत तक्रार देण्याचे सांगत पिटाळून लावले. 

जळगाव : मेहरुण परिसरात असलेल्या विश्‍वकर्मानगर भागातील प्रभाग 14 मध्ये एका महिलेच्या नावाने, तर या. दे. पाटील शाळेच्या केंद्रावर एका नवमतदाराच्या नावाने बोगस मतदान झाले. दोन्ही प्रकरणात दोन वेगवेगळ्या तक्रारी करण्यात आल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेला मतदान करण्यास परवानगी दिली, तर तरुणाला मतदान करण्यास नकार देत पोलिसांत तक्रार देण्याचे सांगत पिटाळून लावले. 
शहरातील मेहरुण परिसरातील प्रभाग 14 (क) साठी विश्‍वकर्मानगरातील महापालिका शाळा क्रमांक 50 मध्ये मतदान प्रक्रिया सुरू होती. दुपारी पावणेदोनच्या सुमारास वैशाली विजय पाटील या मतदान करण्यासाठी केंद्रावर आल्या. मात्र, रांगेत उभे राहून आत गेल्यावर त्यांच्या नावावर "मार्क' करून त्यांच्या नावाचे मतदान झाल्याचे नमूद करण्यात आले. थोड्याच वेळात घडला प्रकार त्यांनी अपक्ष उमेदवार कृष्णा वामन नारखेडे यांना कळविल्यावर त्यांचा मुलगा नीलेश नारखेडे याने केंद्रावर येत निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यावर संबंधित महिलेचे पोस्टल मतदान घेण्यात आले. या संदर्भात तक्रार करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. 

तरुणाला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला 
शहरातील मेहरुण तांबापुरा भागातील रहिवासी रिजवान शब्बीर शेख हा तरुण अडीचच्या सुमारास मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्याच्या नावावर अगोदरच मतदान झाल्याचे सांगण्यात आले. त्याने विनवणी केल्यावर आणि ओळख देत मीच खरा मतदार असल्याचे सांगितल्यावर तुम्ही पोलिसांत तक्रार करू शकता, असा सल्ला संबंधित मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी दिला आहे. 

मला मतदान करता आले. 
माझ्या नावाने दुसरीच महिला मतदान करून गेली. त्यामुळे मला सुरवातीला मतदान करण्यास नकार देण्यात आला. नंतर उमेदवार नारखेडेंना फोन केल्यावर त्यांनी येथील मतदारांना धारेवर धरत तक्रार केल्यानंतर माझे "पोस्टल' मतदान नोंदविण्यात आले. मात्र, माझ्या नावाने बोगस मतदान झाले, त्याचे काय हे कुणीही सांगत नाही. 
- वैशाली पाटील, मतदार 
 

परिसरात बोगस मतदारांकडून मतदान करवून घेतले जात आहे. घडल्या प्रकारावर आपण निवडणूक आयोगाला लेखी तक्रार करणार आहोत. संबंधित महिला उमेदवाराचे नातेवाईक असल्यामुळे आम्हाला हा प्रकार कळला. असा प्रकार इतरही मतदान केंद्रांवर झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

नीलेश नारखेडे अपक्ष उमेदवाराचा मुलगा 

मतदान करण्याचा माझा पहिलाच हक्क बोगस मतदाराने हिरावून घेतला असून, पोलिसात तक्रार करूनही माझे मतदान मला परत देता येणार नाही. हा गोंधळ सरकारी यंत्रणेमुळेच उडाला असून, संबंधितांवर कारवाई व्हावी. 
रिझवान शेख, मतदार 
 

Web Title: marathi news jalgaon frode voter