गाळे नूतनीकरणासाठी जळगाव मनपात हालचाली..उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न ! 

गाळे नूतनीकरणासाठी जळगाव मनपात हालचाली..उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न ! 

जळगाव : शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे नूतनीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनाच्या निर्देशानुसार महात्मा फुले मार्केट आणि सेंट्रल फुले मार्केटमधील बहुतांश गाळेधारकांनी संपूर्ण थकबाकी भरली आहे. पैसे भरलेल्या गाळ्यांच्या नूतनीकरणासाठी काहीही अडचण नसल्याची बाब गाळेमालकांनी निवेदनाद्वारे लक्षात आणून दिली. त्यानुसार महापौर भारती सोनवणे यांनी तत्काळ आयुक्त आणि मुख्य लेखा परीक्षकांशी चर्चा केली. महापालिकेच्या वकिलांसह अधिकाऱ्यांनी सकारात्मक अभिप्राय दिल्याने फुले मार्केट आणि सेंट्रल फुले मार्केटच्या गाळ्यांच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

दरम्यान, त्यामुळे प्राप्त होणाऱ्या महसुलातून शहरातील अनेक विकासकामे मार्गी लावली जातील. महात्मा फुले मार्केट आणि सेंट्रल फुले मार्केटच्या प्रतिनिधींनी आज सकाळी महापौर यांना निवेदन दिले. महापौरांच्या दालनात झालेल्या चर्चेप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी यांच्यासह सेंट्रल फुले मार्केट असोसिएशन अध्यक्ष रमेश मतानी, बबलू समदडिया, दीपक मंधान, फुले मार्केट असोसिएशनचे राजेश वरयानी, बाबूसेठ कौरानी आदी उपस्थित होते. 

महापौरच ठरावाच्या सूचक 
महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना 2014 मध्ये भाड्यापोटी बिले पाठविण्यात आली होती. बिल आकारणी अव्वाच्यासव्वा असल्याने सर्वांनी भरण्यास नकार दिला. गाळेधारकांनी न्यायालयात देखील धाव घेतली होती. याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. 19 फेब्रुवारी 2019 रोजी महासभेत शासनाच्या निर्देशानुसार ठराव क्रमांक 112 हा त्यावेळी सदस्य असलेल्या व आताच्या महापौर भारती सोनवणे यांनी मांडला होता. हाच ठराव आता त्यांच्या समोर आल्याचा योग आला आहे. 

239 गाळेमालकांनी भरले 86 कोटी 
महापालिकेने नव्याने बिल आकारणी केल्यानंतर सेंट्रल फुले मार्केट आणि महात्मा फुले मार्केटमधील 239 गाळे धारकांनी अगोदर 18 कोटी आणि नंतर 68 कोटी असे 86 कोटी रुपये भरले आहे. 239 गाळेधारकांनी महापालिकेत पूर्ण थकबाकी जमा केल्यानंतर तसा दाखला देखील घेतला आहे. उर्वरित व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी चार कोटींचा भरणा केला आहे. 

मनपा प्रशासनही सकारात्मक 
आज दुपारी व्यापाऱ्यांनी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांची भेट घेतली. आमदार महाजन यांनी तत्काळ महापौरांशी चर्चा केली. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांनी दोन दिवसांत तसा प्रस्ताव तयार करून देण्याचे कळविले. महापालिकेचे वकील ऍड. मुजुमदार यांनी देखील 239 गाळ्यांच्या नूतनीकरण संदर्भात सकारात्मक अभिप्राय दिला आहे. 


मनपा उत्पन्नात वाढ अपेक्षित 
फुले मार्केटमधील गाळ्यांच्या नूतनीकरणाचा प्रश्न मार्गी लागल्यावर पूर्वी सहा कोटींचा महसूल मिळत होता. आज सर्व व्यापारी संकुलातील गाळ्यांचे नूतनीकरण केल्यास महापालिकेला तब्बल 55 कोटींचा वार्षिक महसूल मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेला महसूल मिळून शहराच्या विकासाचा अडसर दूर होईल, असे मत महापौर सोनवणे यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com