सुरत, उधना येथे गर्भलिंग तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

जळगाव ः स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी करण्यावर बंदी आहे; परंतु उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गर्भवती माता या गुजरातमधील सुरत व उधना येथे गर्भलिंग तपासणीसाठी दररोज जात आहेत. याबाबत डॉ. संग्राम पाटील व डॉ. नूपुर पाटील यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनपर पत्र पाठविले आहे. 

जळगाव ः स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी करण्यावर बंदी आहे; परंतु उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गर्भवती माता या गुजरातमधील सुरत व उधना येथे गर्भलिंग तपासणीसाठी दररोज जात आहेत. याबाबत डॉ. संग्राम पाटील व डॉ. नूपुर पाटील यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनपर पत्र पाठविले आहे. 
पत्रात म्हटले आहे, की सुरत आणि उधना येथे आठ ते दहा हजार रुपयांत गर्भातील लिंगाचे निदान करून मुलींच्या गर्भ काढण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. स्त्री भ्रूणहत्येच्या असामाजिक प्रकाराविषयी राष्ट्रपती भवन कार्यालयास तक्रार केली असून, गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व आनंदीबेन पटेल यांना गुजरातमध्ये सुरू असलेल्या भ्रूणहत्येबद्दल तक्रार नोंदविली असल्याचे डॉ. पाटील यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना देखील तक्रार करून समस्या मांडली होती. त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी राज्यभर स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध मोहीम हाती घेऊन सुरू असलेले प्रकार तात्पुरते थांबविले होते. राज्यभर अनेक सामाजिक संघटनांनी आवाज उठविल्याने काही दवाखान्यांवर कारवाई झाली. मात्र, महाराष्ट्र राज्यात स्त्रीभ्रूण तपासणीची सुविधा बंद झाल्याने अनेकांनी गुजरात, कर्नाटक तसेच आंध्रप्रदेश राज्यांमध्ये उपलब्ध असलेल्या सेवेचा फायदा घेऊन भ्रूण लिंग तपासणी सुरू ठेवली आहे. देशात मुलींचा जन्मदर खालावलेला असून, अनेक जमातींमध्ये लग्नासाठी मुली मिळत नाही. अशा परिस्थितीत मुलींचा असमतोल हा समाज व देशासाठी घातक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 
 
उत्तर महाराष्ट्रातही दलालांची साखळी 
डॉ. पाटील यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की आपल्या अधिकारातील यंत्रणेचा वापर करून गुजरात, कर्नाटक व आंध्रप्रदेश या शेजारील राज्यांमधील सरकारी यंत्रणेशी संपर्क करावा व मुलींची जन्माआधीच होणारी हत्या थांबवावी. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता गुजरातला मोठ्या संख्येने महिला या स्थानिक डॉक्‍टर व इतर दलालांमार्फत सुरत व इतर शहरांमध्ये जाऊन गर्भलिंग तपासणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी आपल्या स्तरावरून ही साखळी उघड करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon garbhling chaking surat udhna