जळगावकरांसाठी चांगली बातमी... जिल्हा "कोरोना'मुक्त : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहारही सोशल डिस्टन्स पाळून करण्याचे आदेश दिले आहे. जर पाळले नाही त्या समित्यांचे व्यवहार बंद केले जातील. 

जळगावः जळगाव जिल्ह्यात "कोरोना' पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने आता जळगाव जिल्हा "कोरोना'मुक्त झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी अत्यावश्‍यक सेवांची दुकानाची वेळ अकरा ते पाच अशी करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्‍यक सामानच घेण्यासाठी मास्क लावूनच बाहेर पडावे. गर्दी करू नये. सोशल डिस्टन्स ठेवावे. यामुळे जिल्ह्यात "कोरोना'चा संसर्ग होणार नाही. जशी सतर्कता आतापर्यंत पाळली, तशीच पुढेही पाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. 

नक्की वाचा :   सराफबाजार काहीअंशी सुरू करावा...अडचणीच्या काळात सोने विकून भरता येईल पोट
 

जिल्ह्यात आतापर्यंत दोन कोरोना'संशयित आढळले होते. त्यातील एकाचा मृत्यू यापूर्वीच झाला आहे. त्याला इतर आजारही होते. दुसरा संशयिताचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतरच्या दोन्ही टेस्टही निगेटीव्ह आल्या. यामुळे तो आता "कोरोना'मुक्त झाला आहे. त्या रुग्णाला घरी सोडण्यात येईल. आता जिल्ह्यात एकही रुग्ण "कोरोना'चा नाही. आतापर्यंत जिल्ह्यात 742 जणांचे स्क्रिनिंग झाले. 249 जणांचे नमूने पाठविले होते.229 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 16 जणांचे अहवाल पेंडिंग आहे. दोन जणांचे अहवाल रिजेक्‍टेड आहेत.आता 47 संशयित रुग्ण क्वारंटाईन आहेत. 13 जण नवीन संशयित दाखल झाले आहेत. 

जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना वस्तू घेण्यास सोईचे व्हावे यासाठी सर्व किराणा मालाची दुकाने (घाऊक व किरकोळ), भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, रस्त्यावर हातगाडीद्वारा विक्री करणारे फिरते विक्रेते, काही संस्थांद्वारे करण्यात येणारे बाजार कोणत्याही प्रकारे रस्त्यावर अथवा गल्लोगल्ली जाऊन विक्री करणारे विक्रेते यांचे व्यवहार सकाळी 11 ते दुपारी 5 या वेळेतच सुरू राहतील. दुकानदारांना शक्‍यतोवर किराणा, भाजीपाला घरपोच देण्यास सांगितले आहे. 

 

क्‍लिक कराः    कोरोनाग्रस्त जिल्ह्यांना नव्हे तालुक्यांना लॉकडाउन करा : प्रा. संदीप चौधरी  
 

कार्ड धारकांनी गर्दी करू नये 
रेशनकार्डावर धान्य मिळण्यासाठी नागरिक रेशन कार्ड घेऊन रेशन दुकान, तहसील कार्यालयात गर्दी करताना दिसतात. नागरिकांनी तसे करू नये. धान्याचा साठा पुरेसा आहे. ज्यांचे नाव प्राधान्य कुटुंबांच्या यादीत नाहीत, मात्र त्यांच्याकडे केशरी कार्ड आहेत अशांना मे व जून महिन्यात धान्य दिले जाणार आहे. केशरी कार्ड धारकांना 8 रूपये दराने गहू, 12 रूपये दराने गहू दिला जाईल. 1 ते 10 मे दरम्यान फक्त केशरी कार्ड धारकांना धान्य दिले जाईल. 11 ते 20 दरम्यान अंत्योदय व प्राधान्य कुटूंब कार्ड धारकांना धान्य दिले जाईल. केंद्र शासनातर्फे दिले जाणारे पाच किलो तांदूळ 21 ते 30 मे दरम्यान दिले जाईल. 

"ग्रीन लिस्ट'मध्ये समावेश होणार 
"कोरोना'च्या एका संशयित रुग्णामुळे जळगाव जिल्ह्याचा सामावेश शासनाने ऑरेंज लिस्ट मध्ये केला होता. आजच्या स्थितीत एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नाही. यामुळे जळगाव जिल्ह्याचा सामावेश ग्रीन लिस्टमध्ये होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon good news District "Corona'-Free: Collector Dhakane prees confarence stetment