esakal | सराफबाजार काहीअंशी सुरू करावा...अडचणीच्या काळात सोने विकून भरता येईल पोट 
sakal

बोलून बातमी शोधा

gold

सोने, चांदी विक्रीच्या दुकानांना काही अटींवर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन सक्तीचे करून व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी अपेक्षा सराफा व्यावसायिकांनी "सकाळ'कडे व्यक्त केल्या. यातून नागरिकांची सोने मोडण्याची अडचण दूर होऊ शकते.

सराफबाजार काहीअंशी सुरू करावा...अडचणीच्या काळात सोने विकून भरता येईल पोट 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : सोने, चांदीचे दागिने अनेक नागरिक हौसेने घेतात. ही जीवनावश्‍यक वस्तू नसली, तरी काही जण अडीअडचणी काळात घेतलेले सोने विकून दैनंदिन गरजांसाठी त्यावेळची अडचण भागवू शकतात. मात्र, लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार ठप्प असल्याने अशा गरजू लोकांना सोने असूनही ते मोडता येत नसल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिवाय, दागिने घडविणाऱ्या असंख्य कारागिरांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोने, चांदी विक्रीच्या दुकानांना काही अटींवर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन सक्तीचे करून व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी अपेक्षा सराफा व्यावसायिकांनी "सकाळ'कडे व्यक्त केल्या. यातून नागरिकांची सोने मोडण्याची अडचण दूर होऊ शकते. दुसरीकडे बाजारातील व्यवहारही काहीअंशी सुरू होऊन बंद पडलेले आर्थिक चक्र सुरू होण्यास चालना मिळणार आहे. 

सोशल डिस्टन्सिंग पाळू 
सुशील बाफना (संचालक, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स) ः लॉकडाउनमुळे कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे अनेक जण इच्छा असूनही रोजगारासाठी बाहेर पडू शकत नाहीत. अशावेळी नागरिक त्यांच्याकडील असलेले तोळा-मासा सोने मोडून घरातील किराणा भरून काही दिवसांसाठी का होईना, संसाराची अडचण दूर करू शकतात. ही बाजारपेठ ठप्प असल्याने त्यावर दागिने तयार करणारे हजारो कारागीर अवलंबून आहेत, आज त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यादृष्टीने विचार व्हायला हवा. काहीअंशी सोन्याचे दागिने घडविणाऱ्यांचे कारखाने सुरू झाले, तर 
परप्रांतीय कारागिरांची रोजीरोटीची सोयही होईल. 

दुकाने सशर्त सुरू व्हावी 
भागवत भंगाळे (संचालक भंगाळे गोल्ड) ः लग्नाचा सीझन निघून जात आहे. लग्न ठरलेल्यांनी दागिन्यांच्या ऑर्डर दिल्या. मात्र, आम्ही डिलिव्हरी देवू शकत नाही. जळगावमध्ये आता कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्णही नाही. अनेक नागरिक असे आहेत, ज्यांना रोजगारापासून वंचित व्हावे लागले आहे, त्यांच्याकडे रोजचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैसा उपलब्ध नाही. अशावेळी घरात घेऊन ठेवलेले सोने विकून उदरनिर्वाह करता येणे शक्‍य आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काहीअंशी सोने, चांदीचे दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. सोशल डिस्टन्सिंगचे नियम कडक घालून दिले, तरी आम्ही काटेकोरपणे पालन करू. सध्याच्या भाववाढीचा फायदा सोने मोडणाऱ्यांना होऊन त्यांचा सध्याचा आर्थिक प्रश्‍न सुटेल. 

काही वेळ दुकान सुरू राहावीत 
गौतम लुणिया (अध्यक्ष, जळगाव जिल्हा सराफ बाजार असोसिएशन) ः जवळपास तीन-चार आठवड्यांपासून लॉकडाउन सुरू आहे आणि आता आणखी दोन आठवडे वाढल्याने दागिने घडविणाऱ्या कारागिरांची उपासमारीची वेळ येऊ शकते. अनेकांना घरखर्च, आजारपण, उधार-उसनवारी फेडायची आहे. ज्यांच्याकडे सोने आहे, ते मोड देवून हा खर्च भागवू शकतात. यासाठी सराफांना सकाळी अकरा ते पाच यावेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. त्याबाबत लवकरच सराफ असोसिएशन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देणार आहोत. सोने व्यवसायावर अनेकांची कुटुंबे अवलंबून आहे. आता काहीअंशी जरी दुकाने सुरू झाली, तर काही ना काही आधार सामान्यांना मिळू शकेल. 
 

loading image