esakal | आधार लिंकिंग नसल्यास धान्यपुरवठा बंद; शासनाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

आधार लिंकिंग नसल्यास धान्यपुरवठा बंद; शासनाचा इशारा

धुळे जिल्ह्यात दोन लाख १७ हजार लाभार्थ्यांचे आधार सीडिंग बाकी असून, ते तातडीने पूर्ण करण्यासाठी खास मोहीम घेण्यात आली आहे.

आधार लिंकिंग नसल्यास धान्यपुरवठा बंद; शासनाचा इशारा

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानदाराकडे आधार सीडिंगचे काम पूर्ण करून घ्यावे. आधार लिंकिंग नसल्यास फेब्रुवारी-२०२१ पासून संबंधितांचा अन्नधान्य पुरवठा थांबविण्यात येईल, अशा कडक सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आधार लिंकिंगचे काम पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी केले आहे. 
 

आवर्जून वाचा- भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शिरुड गावाची अनोखी शक्कल; जाणून घ्यायचयं, मग वाचा सविस्तर !
 

२२ डिसेंबर २०२० ला शासनाने दिलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी खास मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल लिंकिंग करणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थ्यांना कुठेही जाण्याची गरज नसून आपापल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे आधारकार्डची छायांकित प्रत व अंगठा दिल्यास e-KYC द्वारे आधार सीडिंग होणार आहे. धुळे जिल्ह्यात दोन लाख १७ हजार लाभार्थ्यांचे आधार सीडिंग बाकी असून, ते तातडीने पूर्ण करण्यासाठी खास मोहीम घेण्यात आली आहे. जे लाभार्थी अस्तित्वात नाहीत किंवा सुमारे दोन-तीन महिन्यांपासून ज्यांनी धान्याची उचल केलेली नाही, अशा सर्व लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद करण्याच्या शासनाचा सूचना आहेत. त्याची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे श्री. मिसाळ यांनी म्हटले आहे. 

लाभार्थ्यांशी संपर्क साधा 
याबाबत सर्व तहसीलदारांनी आपल्या स्तरावर बैठका घेऊन स्वस्त धान्य दुकानदारांना माहिती व प्रशिक्षण दिले आहे. ११ जानेवारी २०२१ ला स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे प्रतिनिधी व पुरवठा अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही एकत्रित बैठक घेण्यात आली. त्यात सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आधार लिंकिंगच्या कामासाठी सकाळी आठ ते दुपारी बारा व तीन ते सायंकाळी सातपर्यंत स्वस्त धान्य दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी स्वत:हून लाभार्थ्यांशी संपर्क करून हे काम मुदतीत पूर्ण करावयाचे आहे. या कामात कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना दिल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी मिसाळ यांनी म्हटले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image