ग्राउंड रिपोर्ट : पहूर परिसरात दुष्काळाचे काहूर 

live photo
live photo

पहूर, (ता. जामनेर) : अत्यल्प पर्जन्यमान आणि अवैध पाणी उपशामुळे दुष्काळाच्या वणव्यात पहूर परिसर होरपळून निघत आहे. पाण्याअभावी केळी बागा उद्ध्वस्त होत आहेत. पहूरकरांची तहान भागविणाऱ्या गोगडी प्रकल्पात थेंबभरही पाणी शिल्लक राहिले नसल्याने कोरडा पडलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात मोतीआई धरणावरून पाणीपुरवठा होत आहे. पंधरा ते वीस दिवसांतून नळाला पाणी येत असून, प्रसंगी विकतचे पाणी पहूरकरांच्या ओंजळीत पडत आहे. वर्षानुवर्षे पहूरकरांना दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. 

पहूर गावासाठी वाघूर धरणावरून पाणीपुरवठा होण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी ३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. मात्र, अद्यापही या योजनेला सुरुवात न झाल्याने पहूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महिलांना दूरवरून हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या योजनेला लवकरात लवकर सुरवात होणे आवश्यक आहे. सध्या मोती आई धरणातून पहूरला पाणीपुरवठा होत असून धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे. धरणात फक्त २० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पंधरा ते वीस दिवसांनी ग्रामस्थांना पाणी मिळत आहे. परिणामी, ग्रामस्थांना खासगी टँकरद्वारे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पाण्याअभावी परिसरातील केळी बागा सुकल्या असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतातील उभी केळी डोळ्यासमोर उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. काही शेतकरी केळी वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. 

सांडपाण्याद्वारे भागते गुरांची तहान 
ग्रामपंचायतीने उभारलेले हौद पाण्याअभावी कोरडेठाक असल्याने गुराढोरांना गावातील नदीत साचलेल्या सांडपाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली आहे. पाणी टंचाईसोबतच चाऱ्याचेही दुर्मिक्ष्य जाणवत आहे. चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. शासनाने जामनेर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेला आहे. त्यातच तीव्र उष्णतामानामुळे गुरांना चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. रानोमाळ भटकंती करूनही गुरांना पुरेसा चारा मिळत नसल्याने पशुपालकांवर आपली जनावरे कवडीमोल भावात विकण्याची नामुष्की ओढवली आहे. 

वन्यजीव झाले सैरभैर 
जंगल शिवारातील नदी, नाले, पाणवठे आटल्याने वन्यजीव पाण्यासाठी गावाकडे धाव घेत आहेत. वनविभागाकडून कोणत्याही ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले नाहीत. चिमण्या, कावळे, माकड, ससे, मोर, रानडुक्कर, हरिण आदी वन्यजीव लोंढरी, सोनाळे, पहूर शिवारात आहेत. काही 
शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात प्राण्यांसाठी हौद भरण्याची सोय केली असल्याने पशुपक्ष्यांना दिलासा मिळाला आहे. सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले आहे. भूजल पातळी प्रचंड खालावल्याने कूपनलिका, आड, विहिरी कोरड्या पडत आहेत. शेत शिवारातून बैलगाडीद्वारे पाणी आणावे लागत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com