युतीबाबत काहींची नाराजी; ठाकरेंचा आदेश अंतिम : गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

जळगाव : शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबत शिवसैनिकांची मते वेगवेगळी आहेत. काहींची स्पष्ट नाराजीही आहे. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेऊन आदेश देतील, तो आमच्यासाठी अंतिम असेल. युती झाली तरीही जळगाव लोकसभा मतदार संघ आम्ही शिवसेनेकडे घेण्यासाठी आग्रही आहोत, असे मत सहकार राज्यमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाराबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची आज हॉटेल रॉयल पॅलेस येथे बैठक झाली. यावेळी पक्षाचे जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, पक्षाचे अध्यक्ष गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मुंबईहून मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या एका टीमने कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले. यानंतर अजिंठा विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना गुलाबराव पाटील म्हणाले, की पक्षाच्या बैठकीत आम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या दोन्ही लोकसभा मतदार संघाबाबत भूमिका जाणून घेतल्या. पक्षाच्या काही कार्यकर्त्यांचा भाजपबरोबर युती करण्यास विरोध आहे. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युतीचा निर्णय घेतल्यास त्यांच्या आदेशानुसार युतीचे काम करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, भाजपकडे असलेला जळगाव लोकसभा मतदार संघ यावेळी शिवसेनेतर्फे लढविण्यात यावा, असा आमचा आग्रह असून नवीन जागा वाटपाच्या फार्म्युलातही जळगावचा शिवसेनेकडेच समावेश असल्याचे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले. 
 
प्रशांत किशोर यांच्या टीमचे मार्गदर्शन 
हॉटेल रॉयल पॅलेस येथे घेण्यात आलेल्या बैठकीत "राजकीय मॅनेजमेंट गुरू' असलेल्या प्रशांत किशोर यांच्या टीमने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मुंबईहून आलेल्या टीमने निवडणुकीबाबत वेगवेगळ्या विषयावर माहिती दिली. याबाबत जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी सांगितले, की पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून नियुक्त केलेल्या व्यक्तींनी मार्गदर्शन केले. 

Web Title: marathi news jalgaon gulabrao patil yuti press