भाजपचे माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी खासदार डॉ. गुणवंत रामभाऊ सरोदे (वय 78) यांचे रविवारी दुपारी दीर्घ आजाराने जळगाव येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने जळगावातील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज दुपार सव्वा बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 
 
अल्पपरिचय : 

डॉ. गुणवंत सरोदे यांचा जन्म रावेर तालुक्‍यातील मस्कावद येथे 3 एप्रिल 1940ला झाला. वैद्यकीय (एमबीबीएस) शिक्षर त्यांनी पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर रावेर तालुक्‍यातील सावदा येथे वैद्यकीय सेवा सुरु केली. ग्रामीण भागातील गरीबांचा डॉक्‍टर म्हणून त्यांना ओळखले जायचे. बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या डॉ. सरोदे यांनी 1978मध्ये तत्कालीन जनता पार्टीच्या तिकिटावर रावेर विधानसभेची निवडणूक लढली. 1980मध्ये स्थापन भाजपचे ते जळगाव जिल्ह्याचे संस्थापक अध्यक्ष होते. 1985मध्ये प्रथमच ते रावेरमधून आमदार झाले. 1989मध्ये त्यावेळच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, 1991मध्ये लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. 1996मध्ये त्यांना खासदार म्हणून पुन्हा पसंती मिळाली. जळगाव जिल्ह्यात भाजपचे पहिले आमदार व पहिले खासदार होण्याचा मान डॉ. सरोदेंना जातो. 1995मध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. अलीकडेच 2016ला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्याहस्ते अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. सरोदेंचा भव्य नागरी सत्कार सोहळा झाला होता. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नी श्रीमती श्‍यामला यांचे निधन झाले होते. डॉ. सरोदे यांच्या पश्‍चात मुलगा अतुल व सून प्रिया, दोन मुली किशोरी व विद्या असा परिवार आहे.

Web Title: marathi news jalgaon gunwantrao sarode death