गणेशोत्सवातील उत्साहावर "पाणी' 

live photo
live photo

जळगाव ः तब्बल दहा दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. मात्र, रविवार हा सुटीचा दिवस पाहून गणेशदर्शनासाठी बाहेर पडण्याचे नियोजन केलेल्या भक्तांच्या उत्साहावर पूर्णपणे "पाणी' फिरले. 
जळगावसह जिल्ह्यात आठ दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. दिवसभर काहीसे कडक ऊन पडत होते. मात्र पाऊस पडत नव्हता. गेल्या गुरुवारी, शुक्रवारी मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर जळगावात पाऊस येईल, अशी आशा होती. मात्र, काही ठिकाणीच पावसाने तुरळक हजेरी लावली होती. 

शहरात मुसळधार 
आज मात्र दुपारी पावणेचारच्या सुमारास जळगाव शहरात जोरदार पाऊस बरसण्यास सुरवात झाली. तब्बल एक तास मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे शहरातील सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मुख्य बाजारपेठ असलेल्या नवीपेठेतील रस्ते सखल भागात असल्याने या ठिकाणीही पाणी साचले. मुख्यत्वे याच परिसरात मोठी गणपती मंडळे असल्याने कार्यकर्त्यांचीही धावपळ सुरू झाली. 

नाले वाहू लागले 
दुपारी अर्धा, एकतास जोरदार पाऊस पडला. त्यामुळे समतानगर, हरिविठ्ठलनगर, मू. जे. महाविद्यालय, श्रीधरनगर, गणेश कॉलनी आदी भागांत असलेल्या नाल्यांना पूर आला. सायंकाळपर्यंत पाऊस कमी-अधिक प्रमाणात सुरू असल्याने नागरिकांची मोठी त्रेधा उडाली. अनेक वाहनधारकांचे हालही झाले. 


गणेशभक्तांचा उत्साह विरला 
गणेशोत्सवात एकच वीकेंड होता. शनिवारी शहरातील गणेश मंडळांच्या ठिकाणी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. रविवारी सुटीचा दिवस असल्याने गर्दी होईल, या अपेक्षेने चाट, पदार्थांच्या गाड्या सज्ज होत्या. मात्र, दुपारी सुरू झालेल्या पावसाने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले. सुटीचा दिवस असूनही मंडळांच्या ठिकाणी तुरळक गर्दी झाल्याचे दिसून आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com