
पावसाळा संपल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. सध्या वापरात असलेल्या महामार्गावरील खड्डेही बुजविण्यात येत असून 95 टक्के दुरुस्ती झाली आहे. मुदतीत काम पूर्ण करण्यात येईल.
- मनीष कापडणे (प्रकल्प व्यवस्थापक)
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील फागणे- तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामास संबंधित मक्तेदार एजन्सीने गेल्या आठवड्यात गती दिली आहे. या कामावर सद्य:स्थितीत अडीचशे कामांची टीम विविध तीन ठिकाणी कार्यरत असून त्यात मातीकाम, सपाटीकरण, डांबरीकरण अशी कामे सुरू आहेत. दिलेल्या मुदतीत म्हणजे ऑक्टोबर 2021पर्यंत हे काम पूर्ण करू, असा दावा मक्तेदार एजन्सीच्या प्रतिनिधीने केला आहे.
क्लिक करा - महिलेची अशीही खोटी क्राईम स्टोरी...
फागणे-तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामाबाबत "सकाळ' सातत्याने पाठपुरावा करत असून दोन दिवसांपूर्वीच या थंड कामाबाबतचा आढावा तसेच याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी चुप्पी साधल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. त्या पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत मक्तेदारास सूचना दिल्या व त्यानुसार या कामाला गती देण्यात आली आहे.
हेपण पहा - मधुमेहासाठी जडबुटी देतो म्हणून जंगलात नेले अन् केले हे कृत्य
84 किलोमीटरचा टप्पा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नवापूर- अमरावती या मार्गावरील फागणे- तरसोद हा टप्पा सुमारे 84 किलोमीटरचा आहे. अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर या मक्तेदार कंपनीला हे काम मिळाले असून दीड वर्षापूर्वी या कामाला सुरवात झाली. मात्र, सुरवातीच्या चार-पाच महिन्यांत काही ठराविक भागात सपाटीकरणाच्या कामापलीकडे ते पुढे सरकले नाही व जवळपास वर्षभर हे काम ठप्प झाले होते.
पाठपुराव्यानंतर गती
रखडलेल्या फागणे- तरसोद कामामुळे तसेच सध्या अस्तित्वातील महामार्गाच्या दुरवस्थेमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका सुरू असून निष्पापांचे बळी जात आहेत. त्यामुळे जनमानसात प्रचंड रोष व्यक्त होत असून त्याबाबत "सकाळ'ने पाठपुरावा सुरू केला आहे. त्याचा परिणाम म्हणून या कामाला आता साधारण पंधरा दिवसांपासून गती देण्यात आली आहे.
तीन प्लॅन्ट, अडीचशेची टीम
हे काम गतीने व्हावे यासाठी पाळधी, एरंडोल व पारोळा अशा तीन ठिकाणी प्लॅन्ट सुरू आहे. पाळधी, पारोळ्याहून खडी, माती व मुरमाची आवक होत असून एरंडोल प्लॅन्टमधून डांबराचा पुरवठा केला जात आहे. एकाचवेळी संपूर्ण मार्गावर काम करण्यापेक्षा टप्पा ठरवून त्या टप्प्याचे काम पूर्ण करून घेण्यावर मक्तेदाराचा भर आहे. त्यासाठी अडीचशे जणांनी टीम कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
दोन किलोमीटरचे डांबरीकरण
एकीकडे मातीकाम, मुरूम व खडी टाकण्याचे काम सुरू असून दुसरीकडे हे काम ज्या टप्प्यात पूर्ण झाले त्या एरंडोल- पिंपळकोठादरम्यान दोन-तीन किलोमीटरच्या टप्प्यात डांबरीकरणही करण्यात आले आहे. पाळधीच्या पुढील मुसळी फाट्यापासून पारोळ्यापर्यंतचे काम वेगाने हाती घेण्यात आल्याचा दावा मक्तेदार एजन्सीतर्फे करण्यात आला आहे.
95 टक्के खड्डे दुरुस्ती
चौपदरीकरणाचे काम सुरू असताना सध्याच्या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली होती. यंदा नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसाने महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः: चाळण झाली होती. एरंडोल- जळगाव टप्पा तर अत्यंत बिकट झाला. त्यासाठी पारोळा ते जळगाव अशा संपूर्ण टप्प्यातील 95 टक्के खड्डे गेल्या दोन महिन्यांत बुजण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच चौपदरीकरणाला आणखी गती देऊन ते ऑक्टोबर 2021 पर्यंत कोणत्याही स्थितीत पूर्ण करू, असे सांगण्यात आले.
सर्व मार्गांच्या कामाचा 29च्या बैठकीत आढावा
"सकाळ'ने लोकप्रतिनिधींना रखडलेल्या कामांबाबत जाब विचारल्यानंतर यंत्रणा खडबडून जागे झाली आहे. फागणे- तरसोद टप्प्यासह जळगाव- चाळीसगाव, जळगाव- औरंगाबाद व अन्य मार्गांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व मक्तेदार एजन्सीच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक 29 जानेवारीस जळगावी होत आहे. खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीत या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.