दुर्दैवी घटना : कामानिमित्त बाहेर पडले अन गमावला जीव 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

बांभोरी येथून माघारी परतत असताना एसएसबीटी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली.

जळगाव  : कामानिमित्त आपल्या दुचाकीवर बाहेर गेलेल्या एसटी महामंडळातील वाहकाच्या पोटावरुन भरधाव ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राजेंद्र किसन केवारे (वय 40) असे मृत वाहकाचे नाव आहे. ही घटना आज दुपारी साडेअकराच्या सुमारास बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारसमोर घडली. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पाळधी पोलिसांत कुठलीच नोंद नव्हती. 

पिंप्राळा परिसरातील बालमोहन शाळेजवळील रहिवासी राजेंद्र किसन केवारे हे पत्नी योगिता, मुलगा कुणाल व सुमीत या दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. राजेंद्र केवारे हे एसटी महामंडळात वाहक म्हणून काम करतात. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन असल्यामुळे ते आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवीत होते. बऱ्याच दिवसानंतर राजेंद्र केवारे हे काही कामानिमित्त दुचाकीने (एमएच 19, 5243) बाहेर जातो, असे सांगून बांभोरीकडे निघाले होते. बांभोरी येथून माघारी परतत असताना एसएसबीटी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. या धडकेत केवारे हे खाली कोसळले आणि त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने अपघातस्थळाहून त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात दाखल केला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, वडील दोन मुले असा परिवार आहे. 

नुकतीच झाली होती बदली 
राजेंद्र केवारे हे मूळचे धुळे येथील राहणारे असून, ते नोकरीनिमित्त जळगावात स्थायिक झाले होते. अनेक वर्ष त्यांनी धुळे आगारात नोकरी केली. मात्र, आता त्यांची काही दिवसांपूर्वी जळगावात बदली झाली होती. ते याठिकाणी कार्यरत होते. 

मला पप्पांना बघू द्या... 
राजेंद्र केवारे यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. यावेळी त्यांचा मोठा मुलगा कुणाल याला आपल्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच त्याने हंबरडा फोडत "मला पप्पांना बघू द्या ना...' अशी आर्त हाक देत उपस्थितांना विनवनी केली. यावेळी उपस्थित त्याच्या मित्रांना त्याचा आक्रोश बघून गहिवरून आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon higway aciddent two whiller one deth