esakal | बारावीचा पेपर तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार 
sakal

बोलून बातमी शोधा

hsc exam paper

बारावीचा पेपर तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पातोंडा (ता. अमळनेर) : वाढीव पदाच्या संदर्भात २००३ ते २०१९ या शैक्षणिक वर्षातील मंजुरीसाठी राज्यभरातील शिक्षक आजपासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसले आहे. जोपर्यंत ही पदे आर्थिक तरतुदी सहीत मंजूर होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील, असा निर्धार उपोषण ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षकांनी व्यक्त केला आहे. या उपोषण आंदोलनामुळे बारावीच्‍या पेपर तपासणीवर या शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे. 

राज्यभरातून सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, मुंबई, उपनगर शहर उस्मानाबाद, रत्नागिरी, नागपूर, लातूर अशा विविध जिल्ह्यामधून शिक्षक आज सकाळपासून आंदोलन ठिकाणी एकत्र जमले आहे. शासन गेल्या पंधरा वर्षांपासून पायाभूत वाढीव पदांना मंजुरी देत नसून यामुळे या शिक्षकांना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात असून सुद्धा विनावेतन काम करावे लागत आहे. काही शिक्षक सेवानिवृत्तीच्या मार्गावर असून काहींचे अजून विवाह होणे बाकी आहे. पगार नसल्यामुळे त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांनी शेवटी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. गेल्या तीन वर्षांपासून वेळोवेळी अर्ज विनंत्या करूनही शासन दरबारी अजूनही त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे शेवटी उपोषणाचे हे हत्यार त्यांनी उपसले आहे. अध्यक्ष सचिन चव्हाण, कार्याध्यक्ष पंडित सातपुते व सचिव गिरिश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण चालले असून जोपर्यंत पद मंजूर होत नाही तोपर्यंत आंदोलन ठिकाण सोडायचे नाही असा निर्धार राज्यभरातील शिक्षकांनी केला आहे. 
 
शिक्षक परिषदेचा पाठिंबा 
उपोषणास शिक्षक परिषद संघटनेने पाठिंबा दिला असून आज दिवसभर या शिक्षण परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू उपोषण ठिकाणी ठाण मांडून होते. याच बरोबर विधान परिषदेचे शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांनीही या उपोषण ठिकाणी हजेरी देऊन जो पर्यंत पदे मंजूर होणार नाही तोपर्यंत विधान भवनात यासाठी आवाज उठवून या शिक्षकांना न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन दिले.