मूलभूत सुविधांसह गाळेप्रश्‍न सोडविण्याची पक्षांची हमी 

मूलभूत सुविधांसह गाळेप्रश्‍न सोडविण्याची पक्षांची हमी 

जळगाव : मूलभूत सुविधा देणे, कर्जमुक्ती करणे तसेच गाळेप्रश्‍न सोडविण्याची हमी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला दिली आहे. तिन्ही पक्षांचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. 
महापालिका निवडणुकीत सर्वांत प्रथम जाहीरनामा शिवसेनेने "वचननामा' म्हणून प्रसिद्ध केला. तर भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज "जाहीरनामा' प्रसिद्ध करण्यात आला. 

शिवसेनेचा "वचननामा' 
शिवसेनेचा "वचननामा' प्रकाशित करण्यात आला आहे. यात "मी जळगावकर, आपलं जळगाव' असे ब्रिद असून, सुरेशदादा जैन यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात जळगाव शहराचा विकास गेल्या तीस वर्षांत शहर विकास आघाडी, खानदेश विकास आघाडी यांच्या नेतृत्वात विशिष्ट दिशेने झाल्याचे म्हटले आहे. यात "ई-गव्हर्नन्स'वर अधिक भर देण्यात आला आहे. तर पारदर्शक कारभार, गतिमान प्रशासन, रस्ते विकास, चौक सुशोभीकरण, पाणीपुरवठा, आरोग्य स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, भुयारी गटारी, सार्वजनिक उद्याने, घरकुल पंतप्रधान आवास योजना, शैक्षणिक सुविधा विस्तार, व्यापारी गाळे कराराचे नूतनीकरण, मालमत्तांचे मूल्यांकन, आगामी योजना यावर भर देण्यात आला आहे. यात गाळे कराराबाबत म्हटले आहे, की गाळे दुकानदारांना भाडेतत्त्वावर कराराने देण्यात आले आहेत. या दुकानदारांची भाडेकरार मुदत 2012 ला संपली आहे. या सर्व करारांचे नूतनीकरण करून नव्याने भाडे आकारणी करणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात दुकानदारांना नूतनीकरणाचे प्रस्ताव दिले आहेत. मात्र, काही दुकानदारांनी हस्तक्षेप करून करार होऊ दिले नाहीत. त्यामुळे सर्वच दुकानदार "मनपा'चे थकबाकीदार झाले आहेत. त्यामुळे या दुकानदारांकडून पाच वर्षांचे भाडे व त्यावरील व्याज वसूल केल्यास सुमारे दोनशे कोटी रुपये उभे राहण्याची शक्‍यता आहे. या रकमेतून कर्जफेड होऊ शकेल तसेच नव्या विकास योजनांसाठी निधी उपलब्ध होईल. 

भाजपची बदल घडविण्याची हमी 
भाजपतर्फे आज सर्वसामान्य महिलांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मुखपुष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह नेत्यांचे जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे व आमदार सुरेश भोळे यांचे फोटो आहेत. यात पहिल्याच पानावर "भ्रमनिरास' मथळ्याखाली महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून शहरवासीयांचा भ्रमनिरास झाल्याचे म्हटले आहे. त्यात मूलभूत सुविधा नसल्याचा ऊहापोह करण्यात आला आहे. कर्जमुक्त महापालिका, प्रधानमंत्री आवास योजना, तसेच मालमत्ता सूट अंतर्गत राज्य शासनाच्या परवानगीने शहरातील 300 स्क्वेअरफूट कारपेट एरियाच्या मालमत्तांना घरपट्टीतून सवलतसाठी प्रयत्न करण्याची हमी देण्यात आली आहे. तर अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणारे, ओला-सुका कचरा वर्गीकरण करणाऱ्या, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याऱ्या इमारतींना विशेष सवलतीची हमी देण्यात आली आहे. कर्मचारी विकास प्रयत्न करण्याची हमी आहे, तर अमृत योजना, समांतर रस्ते, उद्योग विकास, गाळेप्रश्‍नाचा ऊहापोह करण्यात आला असून गाळे लिलाव न करता गाळेधारकांचा सर्वतोपरी विचार करून न्यायपूर्ण मूल्यांकनाचे गाळ्यांच्या प्रश्‍नाचे नूतनीकरण करण्याचा विचार करण्याची हमी देण्यात आली आहे. याशिवाय अग्निशामक दल, शिक्षण, फेरीवाला नियोजन, स्मशानभूमी, आपत्ती व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, युवक क्रीडा विकास, आरोग्य व स्वच्छता, उद्याने व मेहरुण तलाव विकास, पार्किंग, मोकळ्या जागा, सांस्कृतिक विकास करण्याबाबतही हमी देण्यात आली आहे. 

"राष्ट्रवादी'तर्फेही विकासावर भर 
राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यात शहराच्या विकासाची हमी देण्यात आली आहे. मुखपुष्ठावर पक्षाचे नेते शरद पवार याचा फोटो असून, त्यासाबेत राज्यातील व जिल्ह्यातील नेत्यांचेही फोटो आहेत. आरोग्य, रस्ते, गटारी, व्यापारी संकुल, शिक्षण, विद्युतीकरण, उद्याने, तसेच उद्योग विकासावर भर देण्यात आला आहे. राष्ट्रवादीने गाळे विकासावर न्यायाची भूमिका घेण्यात येईल तसेच व्यापारी संकुलात सुविधा देण्याचीही हमी दिली आहे. 

"सकाळ'च्या जाहीरनाम्याचा अंतर्भाव 
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जळगाव शहरातील प्रश्‍नांचा ऊहापोह करण्यासाठी "सकाळ'तर्फे शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिकांशी चर्चा करून "जळगावकरांचा जाहीरनामा' प्रसिद्ध केला. जळगावकरांनी व्यक्त केलेल्या विकासाच्या अपेक्षा यात प्रसिद्ध करण्यात आल्या. हा जाहीरनामा सर्व पक्षांच्या नेत्यांना देण्यात आला होता. सर्व पक्षांनी या जाहीरनाम्यातील तरतुदी आपल्या जाहीरनाम्यात घेण्याची हमी दिली होती, त्यानुसार सर्वच पक्षांनी "सकाळ'ने प्रसिद्ध केलेल्या जळगावकरांच्या जाहीरनाम्यातील तरतुदींचा अंतर्भाव करून त्या पूर्ण करण्याची हमीही दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com