कारागृहातील बॅरेकमध्ये आढळला कैद्याचा मृतदेह 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

जळगाव : दंगलीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात असलेल्या कच्च्या कैद्याचा आज पहाटे मृत्यू झाला. दंगलीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून अटकेत असलेला हा कैदी चार दिवसांपूर्वीच जळगाव कारागृहात आला होता. आल्यापासून तो आजारी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. कारागृह प्रशासनाच्या निष्काळजीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. 

जळगाव : दंगलीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात असलेल्या कच्च्या कैद्याचा आज पहाटे मृत्यू झाला. दंगलीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून अटकेत असलेला हा कैदी चार दिवसांपूर्वीच जळगाव कारागृहात आला होता. आल्यापासून तो आजारी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. कारागृह प्रशासनाच्या निष्काळजीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. 
आंदलवाडी (ता. रावेर) येथील रहिवासी रवींद्र गंभीर कोळी (वय 37) याला 24 मे 2018 ला निंभोरा पोलिस ठाण्यात दंगल व शासकीय नोकरांवर हल्ला केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीनंतर 27 जूनला जळगाव कारागृहात आणण्यात आले. कारागृहात आणल्यापासून त्याची तब्येत खराबच होती. 

रुग्णालयातून परत कारागृहात 
शनिवारी (30 जून) अधिक ताप व जीव घाबरत असल्याने कारागृह प्रशासनाने "मेडिकल मेमो' देत त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. तेथे ओषधोपचार घेतल्यानंतर त्याला परत कारागृहात पाठविण्यात आले. रात्री कारागृहातील इतर संशयितांसोबत बॅरेकमध्येच रवींद्र झोपून होता. मध्यरात्रीपासून त्याला त्रास जाणवू लागल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत बॅरेकमधील सहकाऱ्यांनी घडलेला प्रकार कारागृह कर्मचाऱ्यांना सांगितला. मात्र, तोपर्यंत रवींद्रचा मृत्यू झाला होता. घटनेमुळे कारागृहात एकच धावपळ उडाली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात घटना कळविल्यानंतर, "डेथ इन कस्टडी'चे प्रकरण असल्याने विषय राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे असल्याने "सीआयडी'च्या पथकाने कारागृहात येत रवींद्रशी संबंधित सर्व दस्तऐवज ताब्यात घेत मृतदेह विच्छेदनासाठी धुळे येथे रवाना करण्यात आला. 
 
प्रशासनावर कुटुंबीयांचा संताप 
रवींद्रला आजारी असतानाही वेळीच उपचार झाले नाहीत. कारागृह प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर जिल्हा रुग्णालयातील संबंधित डॉक्‍टरांनी थातूरमातूर गोळ्या- औषधे देत परत कारागृहात रवाना केले. अटकेतील संशयिताची तब्येत गंभीर असताना त्याकडे जाणीवपूर्वक निष्काळजी केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कैलास कोळी, ऍड. राकेश पाटील यांनी केला. 
 
"इन कॅमेरा' शवविच्छेदन 
रवींद्रच्या मृत्यूसंदर्भात कारागृह प्रशासनाने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात माहिती दिल्यावरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. नातेवाइकांनी प्रशासनावर निष्काळजीचे आरोप केले असल्याने तसेच प्रकरण "डेथ इन कस्टडी'चे असल्याने वैद्यकीय समितीच्या देखरेखीत शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
सामान्य कुटुंबीय 
आंदलवाडी येथील रहिवासी रवींद्र कोळी हा हातमजुरी करून पत्नी, दोन मुले व मुलगी अशा कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्यासह कुटुंबात वृद्ध आई, मोठा भाऊ असा परिवार असून, रवींद्रला दारूचे व्यसन असल्याचेही बोलले जाते. 

उपचारासाठी योग्य वेळीच पाठवले 
रवींद्रला बरे वाटत नसल्याने सुरवातीला गोळ्या- औषध दिले. नंतर शनिवारी (30 जून) अधिक त्रास होत असल्याने त्याला "मेमो'सह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे उपचार झाले. नंतर सायंकाळी त्याला रुग्णालयातून परत पाठवले. व्यसन आणि उष्णतेचाही त्याला त्रास असल्याने औषधोपचार सुरू होते. रुग्णालयातून आल्यानंतर रात्री झोपेतच त्याचा त्रास वाढून मृत्यू जाला. 
- बी. डी. श्रीराव, सहाय्यक कारागृह अधीक्षक 

Web Title: marathi news jalgaon jail bareck kaidi daith