अरे देवा...धुळीच्या "ऍलर्जी'ने जळगावकर बेजार! 

jalgaon city
jalgaon city

जळगाव: शहरासह उपनगरातील मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या प्रचंड प्रमाणातील धुळीमुळे सर्वसामान्यांचे आरोग्य "सलाइन'वर आहे. धुळीत असणाऱ्या "डस्ट माइट्‌स'सह इतर अनेक गोष्टींमुळे जळगावकरांना ऍलर्जी उद्‌भवत आहे. सतत शिंका येणे, हातापायांवर पुरळ येणे, डोळे लाल होणे किंवा जळजळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा निरनिराळ्या तक्रारी उद्‌भवू लागल्या आहेत. 

शहरासह उपनगरांतील विविध कामांमुळे रस्ते खोदण्यात आले. परिणामी, रस्ते खड्डेमय झाले आहेत. सध्या वाहनधारकही धुळीने माखला जातो. रस्त्यावर केवळ मातीच माती असल्यामुळे दुचाकीधारक मातीच्या धुक्‍यात हरवला जात आहे. वाहनांचे चालक तथा प्रवासी निवासस्थानी पोचताच प्रथम अंगावरील धूळ झटकताना दिसून येतो. धुळीच्या या ऍलर्जीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी औषधे उपलब्ध असली, तरी या औषधांच्या सेवनाचे दुष्परिणामही शरीरावर होतात. शहरासह जिल्हाभरातील तज्ज्ञ डॉक्‍टरांकडे सर्दी, खोकला, शिंका येणे, हातापायांवर पुरळ आदी आजाराच्या रुग्णांची गर्दी वाढली आहे. 

कशी होते "डस्ट ऍलर्जी'? 
"डस्ट ऍलर्जी' ही फक्त धुळीने नाही, तर धूर, वातावरणातील बदल, मायक्रो पार्टिकल्सच्या हवेत असलेल्या जास्त प्रमाणाने आणि प्रदूषणाच्या वाढत्या स्तरामुळे वाढते. या ऍलर्जीमुळे खूप शिंका येतात, नाक वाहते, डोळ्यांतून पाणी येते आणि डोळे लाल होतात. सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यासही त्रास होतो. 

"ऍलर्जी' म्हणजे... 
तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मते "ऍलर्जी' म्हणजे एखाद्या गोष्टीचे शरीराला वावडे असणे. त्या वस्तूच्या, पदार्थाच्या, अन्नाच्या संपर्कात आल्यास माणसाचे आरोग्य बिघडते. अशा ऍलर्जीमुळे माणसाचा जीव नकोसा होतो. काहींचे ऍलर्जीमुळे सतत नाक गळत राहते. काहींना ऍलर्जीमुळे खोकला येतो. क्‍वचित प्रसंगी अस्थम्याच्या रुग्णांसारखा त्रासही होतो. याशिवाय, अनेक पद्धतीचे त्रास ऍलर्जीमुळे होऊ शकतात. ऍलर्जी होते याचा अर्थ आपली प्रतिकारशक्‍ती कमकुवत झाली आहे. काही जणांमध्ये ऍलर्जीचा त्रास अनुवंशिकरीत्या जाणवतो. 

धुळीचे दुष्परिणाम 
 त्वचा कोरडी पडणे, त्वचा लालसर होऊन त्यावर पुरळ येणे, खाज सुटणे. 
 डोळ्यात कोरडेपणा येऊन ते लाल पडणे. 
 डोळ्यात घाण साचल्याने ते चुणचुण करणे. 
 दमा (अस्थमा) होणे, न्यूमोनिया, फुफ्फुसाचे आजार, सर्दी, खोकला, घशाचे विकार होणे. 

धुळीपासून वाचण्याचे उपाय 
 स्वच्छ पाण्याने वारंवार डोळे धुवावेत. 
 वाहन चालवत असताना गॉगलचा वापर करावा. 
 तोडाला मास्क लावावे किंवा स्वच्छ रुमाल बांधावा. 
 त्रास होत असेल तर तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

वेगवेगळ्या ऍलर्जींवर आयुर्वेदीय उपचार केले जातात. अनेकांना नाक चोंदणे, वारंवार नाकातून पाणी येणे, शिंका येणे यांसारख्या आजारांवर बनविलेले खास तेल नाकात टाकल्यास आराम मिळतो. धुळीच्या ऍलर्जीमुळे सर्दी किंवा खोकल्यापासून आरामासाठी निलगिरीचे तेल गरम पाण्यात घालून त्याची वाफ घ्यावी. 
 डॉ. कविता अढिया, आयुर्वेदतज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com