न्यायालयाने केले आश्‍वस्त... आणि सहा दिवसांनी स्वीकारला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

न्या. पी.वाय. लाडेकर यांनी या प्रकरणाची दखल घेत तक्रारी अर्जाप्रमाणे कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर तक्रारदारांचे वकील ऍड. गणेश सोनवणे यांनी कुटुंबीयांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तयार केल्यावर बुधवारी संध्याकाळी सुनील तारू यांच्या पत्नी मंगला तारू व त्यांच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. 

जळगाव : न्यायालयीन कोठडीत अमानुष मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर संबंधित संशयिताचा मृतदेह त्याच्या नातलगांनी न्यायालयाने आश्‍वस्त केल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी ताब्यात घेतला. मृताच्या पाठीवर मोठे व्रण व डोक्‍यात गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

मंगला तारू यांनी ऍड. गणेश सोनवणे यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयाला दिलेल्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे, सुनील भागवत तारू यांना मुक्ताईनगर पोलिसांनी (29 फेब्रुवारी) पकडून नेले. ते, 5 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत होते. त्यांच्यावर न्यायालयीन कोठडीतच अमानुष अत्याचार करून खूप मारहाण केल्यानंतर प्रकृती खालावल्याने आम्हाला न कळवता रुग्णालयात आणून टाकले. पती बेशुद्धावस्थेत असल्याने त्यांच्याशी बोलणेही होऊ शकले नाही. अखेर धुळे येथे उपचारार्थ हलविल्यानंतर तेथे त्यांचा शनिवारी (ता.7) मृत्यू झाला होता. प्रकरण सीआयडीकडे तपासाला गेल्यानंतरही कुटुंबीयांचे समाधान झाले नाही. अखेर जिल्हा न्यायालयात वकिलांमार्फत तक्रारी निवेदन सादर करण्यात आल्यावर न्या. पी.वाय. लाडेकर यांनी या प्रकरणाची दखल घेत तक्रारी अर्जाप्रमाणे कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर तक्रारदारांचे वकील ऍड. गणेश सोनवणे यांनी कुटुंबीयांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तयार केल्यावर बुधवारी संध्याकाळी सुनील तारू यांच्या पत्नी मंगला तारू व त्यांच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. 

क्‍लिक कराःविधीमंडळात मांडला "कचराकोंडी'चा प्रश्‍न; आमदार सुरेश भोळे  
 

काय आहे प्रकरण ? 
सुनील भागवत तारू तारखांना हजर राहत नाही. यासाठी मुक्ताईनगर पोलिसांनी 29 फेब्रुवारीला शेतात काम करीत असताना अटक केली होती. यानंतर भुसावळ न्यायालयात हजर केले असता भुसावळ कारागृहात रवानगी केली होती. 3 मार्चला कारागृहात प्रकृती खालावल्याने दुसऱ्या दिवशी 4 मार्चला त्यांना वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालय जळगाव, येथे हलवण्यात आले. यानंतर धुळे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचार सुरू असताना शनिवार (ता.7) त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. सुनील यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यातील तक्रारदार त्याच्या काकासह त्याला अटक करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीवर तिसऱ्या दिवशीही नातेवाईक कुटुंबीय ठाम होते. 

नक्की वाचा :  अरेच्चा... खराब रस्ते दाखविण्यासाठी..चक्क महापौरांना चालवावी लागली दुचाकी ! 
 

डोक्‍यावर गंभीर मार 
मृत सुनील तारू यांना जळगावात रुग्णालयात आणल्यावर पत्नी मंगलाने अंग पुसण्यासाठी पाठ पाहिल्यावर त्यांना मारहाणीचे व्रण दिसून आले होते. तेव्हाच त्यांनी तक्रारही केली होती. मात्र, उपचार गरजेचे असल्याने त्यांना धुळे वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविण्यात आले होते. मृतदेहाचे वैद्यकीय समितीसमक्ष शवविच्छेदन करण्यात आले. त्यात अंगाला मुका मार आणि "हेड इन्ज्युरी'ने मृत्यूचे कारण समोर आल्याचे नातलगांनी सांगितले.

आर्वजून पहा : coronavirus : खबरदार..."कोरोना'ची अफवा पसरावाल..तर खावी लागणार जेलची हवा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Assurance made by the court Six days later the body was taken