फागणे- तरसोद चौपदरीकरण या टर्ममध्येही होणे नाही..!

फागणे- तरसोद चौपदरीकरण या टर्ममध्येही होणे नाही..!

जळगाव  : हायब्रीड ऍन्युइटी तत्त्वावर अवघ्या 87 किलोमीटर टप्प्यातील चौपदरीकरणाचे कंत्राट देऊन दोन वर्षे उलटून गेल्यानंतर अवघे 20 टक्केही काम पूर्ण होऊ नये, हे फागणे- तरसोद टप्प्यातील कामाचे व पर्यायाने या टप्प्यात येणाऱ्या सर्वच गाव-शहरातील नागरिकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. दररोज बळी घेणाऱ्या या महामार्गाचे चौपदरीकरण आजही थंड बस्त्यात असून उदासीन मक्तेदार, ढीम्म महामार्ग प्राधिकरण आणि खासदारांचेही दुर्लक्ष या स्थितीने आणखी पाच वर्षे तरी हे काम होईल का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर फागणे- तरसोद या टप्प्यातील मार्ग गुजरातला खानदेशमार्गे विदर्भाला तर मुंबईला थेट नागपूरशी जोडतो. या महामार्गावर फागणे- तरसोद व तरसोद- चिखली या दोन टप्प्यातील अनुक्रमे 87.3 व 62.7 किलोमीटरच्या चौपदरीकरणाची कामे दोन वर्षांपूर्वी एकाचवेळी सुरु झाली. पैकी फागणे- तरसोद काम आधी सुरु होऊन सपाटीकरणाने वेगही पकडला होता. सुरवातीचे दोन-चार महिने काम झपाट्याने झाले. मात्र, नंतर हे काम असे काही थंड बस्त्यात गेले की, दोन वर्षांनंतरही 20 टक्के कामही पूर्ण झालेले नाही. 

मक्तेदाराची समस्या 
सुरवातीच्या टप्प्यात काम सुरु झाले तेव्हा दिलेल्या 30 महिन्यांच्या मुदतीत ते पूर्ण होईल, असे वाटत होते. मात्र, दोन वर्षांत या कामाची अक्षरश: दशा झाली. सुरवातीला चार-पाच महिन्यात झालेल्या सपाटीकरणावर पुन्हा काटेरी झाडे-झुडपे उगली आणि सर्व काम वाया गेले. आता पुन्हा सहा- आठ महिन्यांपासून काम सुरु झाले खरे, मात्र ते अत्यंत कासवगतीने होत असून त्याकडे कुणाचेच लक्ष नाही. याबाबत समस्या जाणून घेतली असता मक्तेदाराकडे निधीची अडचण असल्याचे सांगण्यात आले. 

अधिकारी, मक्तेदाराकडून उडवाउडवी 
या कामावर महामार्ग प्राधिकरणाचे (न्हाई) अधिकारी म्हणून प्रकल्प संचालक सी.एम. सिन्हा यांचे नियंत्रण आहे. त्यांना या कामाबाबत केव्हाही विचारले तर त्यांचे "अभी आठ दिन मे यह काम पुरी क्षमता से शुरू होगा' हे उत्तर ठरलेले असते. त्यांचे ते आठ दिवस कधीच आले नाही. मक्तेदार एजन्सी आग्रोह कन्स्ट्रक्‍शनचे प्रतिनिधी असलेले मनीष कापडणे यांना विचारले तर "आमचे काम जोरात सुरु आहे..' हे त्यांचे ठरलेले उत्तर. प्रत्यक्षात "सकाळ'ने दोनवेळा स्पॉट व्हिजिट करुन या कामाचा आढावा घेतला असता दोन्ही वेळेस या सुमार 87 कि.मी. कामाच्या टप्प्यात अवघे दहा- बारा कामगार व पाच-सात मशिन काम करताना दिसले. 

आणखी पाच वर्षे लागणार 
सध्या या कामावर दहा- बारा मजुरांच्या वर व पाच-सात मशीनपेक्षा अधिक मशिन्स कार्यरत नाहीत. अशा स्थितीत या कामाच्या पूर्णत्वाचा हिशोब केला तर आणखी पाच वर्षे तरी हे काम पूर्ण होऊ शकत नाही. सद्य:स्थितीत या संपूर्ण टप्प्यात केवळ सपाटीकरण तेवढे पूर्ण झाले असून काही ठिकाणी तर तेदेखील अपूर्ण आहे. पिंपळकोठा-एरंडोलदरम्यान दोन-तीन किलोमीटरचा डांबरीकरणाचा पट्टा तेवढा करुन ठेवला आहे. जोपर्यंत समांतर डांबरीकरण होईल, तोपर्यंत आता केलेला डांबरीकरणाचा पट्टाही टिकतो की नाही? हा प्रश्‍नच आहे. 

तरसोद- चिखली जोरात 
त्या तुलनेत तरसोद- चिखली या टप्प्यातील 62 किलोमीटर अंतरातील काम जोरात सुरु आहे. हे काम तरसोदलगत फोर्डच्या शो-रुमपासून थेट चिखलीपर्यंत बरेचसे पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी उड्डाणपूलही तयार असून साकेगावचा पूल नुकताच कार्यान्वित झाला आहे. वाघुर नदीवरील पुलाचे काम दिवसरात्र सुरु असून साधारणत: सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल, अशी स्थिती आहे. 

फागणे- तरसोदची स्थिती 
एकूण अंतर : 87.3 कि.मी. 
मंजूर निविदा खर्च : 940 कोटी 
आतापर्यंतचे काम : 20 टक्के 
कामावरील यंत्रणा : 10-12 कामगार, 5-7 मशिन्स 
मक्तेदार एजन्सी : आग्रोह कन्स्ट्रक्‍शन 

तरसोद- चिखलीची स्थिती 
एकूण अंतर 62.7 कि.मी. 
मंजूर निविदा खर्च 948.25 कोटी 
आतापर्यंतचे काम : 70 टक्के 
कामावरील यंत्रणा : 700वर कामगार व 100 मशिन्स 
मक्तेदार एजन्सी : वेल्स्पन कॉर्पोरेशन 

रक्षा खडसेंचा पाठपुरावा 
- निविदा प्रक्रियेपासून लक्ष 
- गडकरींकडे सातत्याने पाठपुरावा 
- कार्यक्षम मक्तेदारासाठी आग्रह 
- वेल्स्पन कॉर्पो.कडे दिले काम 
- कामाबाबत वरिष्ठांशी सतत संपर्क 


ए.टी. नाना, उन्मेश पाटील उदासीन 
- निविदा प्रक्रियेपासूनच दुर्लक्ष 
- कामाचा पाठपुरावा नाही 
- स्थानिक बैठकांपलीकडे पाठपुरावा नाही 
- मक्तेदारावर नियंत्रणाकडे दुर्लक्ष 
- वरिष्ठ स्तरावरुनही प्रयत्न नाही 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com