जिनिंग व्यवसायाला यंदा "अच्छे दिन' 

देविदास वाणी
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

जळगाव ः जळगाव जिल्ह्यासह खानदेशात यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे कापूस उत्पादनात पंधरा ते वीस टक्के वाढ होणार आहे. याचा परिणाम जिनिंग प्रेसिंग व्यवसायावर होऊन गतवर्षी पेक्षा यंदा 90 जिनिंग मिल सुरू होण्याचे आशादायक चित्र आहे. सध्या सुरू असलेल्या बिगरमोसमी पावसामुळे कपाशीचे उत्पादनाचा हंगाम उशिराने येणार आहे. दरवर्षी दहा ते पंधरा ऑक्‍टोबरला कापूस हंगाम सुरू होतो. यंदा 1 नोव्हेंबरपासून नवीन कापूस येणार आहे. 

जळगाव ः जळगाव जिल्ह्यासह खानदेशात यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे कापूस उत्पादनात पंधरा ते वीस टक्के वाढ होणार आहे. याचा परिणाम जिनिंग प्रेसिंग व्यवसायावर होऊन गतवर्षी पेक्षा यंदा 90 जिनिंग मिल सुरू होण्याचे आशादायक चित्र आहे. सध्या सुरू असलेल्या बिगरमोसमी पावसामुळे कपाशीचे उत्पादनाचा हंगाम उशिराने येणार आहे. दरवर्षी दहा ते पंधरा ऑक्‍टोबरला कापूस हंगाम सुरू होतो. यंदा 1 नोव्हेंबरपासून नवीन कापूस येणार आहे. 

यावर्षी 120 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सर्वच धरणात शंभर टक्के पाणी साठा आहे. नद्या, नाले दुथडी भरूनही वाहत आहे. यामुळे काही पिकांची स्थिती हलाखीची असली तरी कापूस, ज्वारीची पिके काही ठिकाणी चांगली आहेत. पावसाची उघडीप सुरू असल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत होत आहे. 

गत वर्षी 60 टक्के मिल बंद 
गतवर्षी 76.8 टक्के पाऊस झाला होता. यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट आली होती. कपाशीला अधिक दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस हवा तसा विकला नाही. यामुळे खानदेशातील जिनिंग व्यवसाय साठ टक्के बंद होते. जिनिंग व्यवसाय करणाऱ्यांसह कामगाराला याची झळ पोचली होती. 

यंदा कापसाचे उत्पादन वाढेल 
यंदा मात्र कपाशीचे उत्पादन वाढणार आहे. शासकीय कापूस खरेदी 5550 हमी भावाने होणार आहे. खासगी व्यावसायिक मात्र 4800 ते 5200 पर्यंत दर देण्याच्या तयारीत आहेत. साडेतीनशे रुपयांचा दर व्यापारी कमी देणार आहेत. असे असले तरी शेतकऱ्यांना जागेवरच पेमेंट व्यापारी देतील. शासनाच्या कापूस खरेदी केंद्रावर कापूस विकल्यास शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी, अकाउंट नंबर देणे, आधारकार्ड देणे आदी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. शासकीय ग्रेडर कपाशीची आर्द्रता पाहून कापूस खरेदी करणार अन्यथा खरेदी करणार नसल्याचे चित्र कापूस खरेदी केंद्रावर असते. यामुळे बहुतांश शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विकून गुंतविलेले भांडवल मोकळे करून घेण्यावर भर देतात. 

चार हजार कोटींची उलाढाल शक्‍य 
यंदा पाऊस अधिक पडला असल्याने कापूस उत्पादन अधिक होईल या आशेने आलेला कापूस शेतकरी विकण्यावर अधिक भर देतील. जिनिंगकडे कपाशीची आवक वाढली की 110 पैकी 90 जिनिंग मिल्स सुरू होतील अशी माहिती जिनिंग व्यावसायिकांनी दिली. खानदेशात सुमारे 15 ते 18 लाख गाठींचे उत्पादन होते. यंदा त्यात वाढ होऊन 20 लाखांपर्यंत गाठींची निर्मिती होऊ शकेल. त्यातून सुमारे 4 हजार कोटींची उलाढाल होण्याची शक्‍यता आहे. 

कापूस उत्पादन अधिक झाल्याने साहजिकच खानदेशातील जिनिंग, प्रेसिंग व्यवसायाला झळाळी येणार आहे. यंदा किमान वीस लाख गाठींचे उत्पादन होईल असा विश्‍वास आहे. कपाशीचा दर व्यापारी 4800 ते 5200 देतील. यंदा कापूस येण्याचा हंगाम लांबेल. 

-प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jining udyog ache din