जिल्हा परिषदेच्या ३४४ वर्गखोल्या धोकादायक 

सुनील पाटील
गुरुवार, 18 जुलै 2019

चोपडा ः जिल्हा परिषदेच्या १५४ शाळांमधील ३४४ वर्ग खोल्या धोकादायक झाल्या आहेत. शाळांमध्ये शिक्षणाची बाराखडी गिरविणाऱ्या हजारो चिमुकल्यांचा जीव धोक्यात असून, ऐन पावसाळ्यात विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाकडून वर्गखोल्या पाडण्याच्या आदेशास दिरंगाई होत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे. 

चोपडा ः जिल्हा परिषदेच्या १५४ शाळांमधील ३४४ वर्ग खोल्या धोकादायक झाल्या आहेत. शाळांमध्ये शिक्षणाची बाराखडी गिरविणाऱ्या हजारो चिमुकल्यांचा जीव धोक्यात असून, ऐन पावसाळ्यात विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाकडून वर्गखोल्या पाडण्याच्या आदेशास दिरंगाई होत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे. 
संबंधित खोल्यांच्या निर्लेखन करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले आहेत. या शाळांच्या इमारतीची पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिट करून निर्लेखन करण्याची गरज असल्याचा अहवाल निर्लेखन तपासणी समिती प्रशासनास दिला आहे. मात्र, यावर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव होऊन मंजुरी दिली आहे. मात्र, अधीक्षक अभियंता (नाशिक) यांची परवानगी मिळाली नसल्याने अडसर येत आहे. जिल्ह्यातील शेकडो धोकादायक इमारतींचे निर्लेखन करण्याचे भिजत घोंगडे पडले आहे. त्या इमारतीच्या भिंतींना तडे गेले आहेत. इमारतीचे लाकूड खराब झाले आहे. काही इमारतीवरील कौल फुटले आहेत. त्यामुळे इमारतीच्या वर्गखोल्या गळक्या झाल्या आहेत. तसेच भिंतींना तडे गेल्याने त्यामध्ये सध्या पडत असलेल्या रिमझिम पावसाचे पाणी गेल्यास विपरीत हानी होण्याची शक्यता आहे. वाऱ्याने एखादे कौल शाळकरी बालकांच्या अंगावर पडल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. या इमारती मधील वर्गखोल्याही धोकादायक व जीर्ण झाल्याने वर्गखोल्यांसह पूर्ण इमारत पाडण्यासाठी जिल्ह्यातील काही जि. प. शाळांकडून जिल्हा प्रशासनाकडे इमारत पाडण्यासाठी परवानगीचा प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र, याबाबत दिरंगाई होत असून, प्रशासनाची डोळेझाक होत आहे. या दुर्लक्षित बाबीमुळे शिक्षणाची बाराखडी गिरवायला आलेल्या चिमुकल्याच्या जिवावर होणारी दुर्घटना बेतू शकते. सध्या शाळा सुरू असल्याने चिमुकले मधल्या सुट्टीत, अथवा खेळण्याच्या तासिकेला जीर्ण इमारती जवळ गेल्यास त्या इमारतीच्या भिंतीमधून तडे गेलेल्या ठिकाणातून दगड, कौल पडतात यामुळे लहान बालकांच्या जिवाला धोका पोहोचू शकतो याकडे तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. 

बांधकामास नऊ दशके पूर्ण 
तालुक्यातील काही ठिकाणच्या इमारतीच्या बांधकामास जवळपास ८० ते ९० वर्ष झालेले आहेत. त्यांची साधी डागडुजीही केली नसल्याने इमारतीमधील वर्गखोल्या धोकादायक झालेल्या दिसून येत आहेत. प्रशासनाची डोळेझाक होत असून, चिमुकल्याच्या जिवाशी प्रशासन खेळत असल्याची प्रतिक्रिया काही पालकांनी दिल्या. 

तालुकानिहाय शाळा, कंसात वर्गखोल्या 
भडगाव ०३ (०९), भुसावळ ११ (१७), बोदवड २ (१४), चाळीसगाव १६ (४३), चोपडा १५ (३९), धरणगाव १४ (३८), एरंडोल १३ (२९), जळगाव ०५ (१४), जामनेर ०३ (०५), पाचोरा ३१ (६६), मुक्ताईनगर ०९ (१७), पारोळा १ (०४), रावेर ३१ (४९) यावल व अमळनेर (०) अशा एकूण १५४ शाळांमधील ३४४ शाळांमधील वर्गखोल्या धोकादायक व जीर्ण झाल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jllha parishad 344 school room jirn