विद्यापीठाच्या 304 कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता 

विद्यापीठाच्या 304 कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता 

जळगाव  : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन 2020-21 च्या 304.52 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या अधिसभेत मान्यता देण्यात आली. या अंदाजपत्रकात 34.95 कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. 

शुक्रवारी (ता. 13) अधिसभेची बैठक झाली. सदस्य दीपक बंडू पाटील यांनी अधिसभेत अंदाजपत्रक सादर केले. यामध्ये परिरक्षणासाठी 189.80 कोटी रुपये, योजनालगत विकासासाठी रुपये 57.46 कोटी आणि विशेष कार्यक्रम योजनांसाठी 57.26 कोटी अशी खर्चासाठी एकूण 304.52 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अंदाजपत्रकात उत्पन्नाची बाजू 269.57 कोटी इतकी असल्यामुळे 34.95 कोटी इतक्‍या तुटीचा हे अंदाजपत्रक आहे. खर्चात बचत करून ही तूट भरून काढण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विकासाला चालना देणारे हे अंदाजपत्रक आहे. 

विद्यापीठात शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण व आदिवासी भागातील असून त्यांच्या शिक्षणासाठी आवश्‍यक त्या सुविधा देण्याचा संकल्प यात करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशाळा व उपकेंद्रासाठी 13.19 कोटींची तरतूद करण्यात आली असून विविध प्रशाळांतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना संशोधन करताना अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून टीचिंग असोसिएटशिप प्रोग्रॅम अंतर्गत 25 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी कल्याण, क्रीडा, वसतिगृह आदी विभागांतर्गत विविध योजनांसाठी 8.37 कोटींची तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ विविध 37 योजना राबवीत आहे. मागील वर्षाच्या या सर्व योजना कायम ठेवण्यात आल्या आहेत. क्रीडा अंतर्गत असलेल्या 13 योजनांसाठी 10 लाख रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाच्यावतीने सेंटर फॉर एक्‍सलन्स व सिलेज उपक्रमांतर्गत प्रस्तावित नावीन्यपूर्ण प्रकल्पांसाठी 1 कोटी 5 लाख रुपयांची तरतूद केली, असून आंतर शाखीय विद्यावाचस्पती विद्यार्थ्यांकडून आदिवासी भागातील उपक्रमांसाठी विविध संशोधन प्रकल्प राबविले जाणार आहेत. नंदुरबार येथे सिलेज आधारित क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत 113पाडयांची निवड करण्यात आली असून विविध सहभागी संस्थासोबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

दीपक पाटील यांनी मांडलेल्या अंदाजपत्रकानंतर त्यावर अनेक सदस्यांनी आपले मत व्यक्त केले. या अंदाजपत्रकाचे सर्व सदस्यांनी स्वागत केले. विविध प्रकारच्या नवीन योजना या अंदाजपत्रकात मांडण्यात आल्या असून त्याद्वारे विद्यापीठ विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून सदस्यांनी काही सूचना देखील केल्या. या चर्चेत प्राचार्य आर. एस. पाटील, प्रा. संजय सोनवणे, अमोल मराठे, दिलीप पाटील, दिनेश नाईक, एकनाथ नेहेते, के. जे. कोल्हे, आदींनी भाग घेतला. नितीन ठाकूर व प्रा. गौतम कुवर यांनी कपात सूचना मांडल्या होत्या. चर्चेनंतर त्या मागे घेण्यात आल्या. त्यानंतर अंदाजपत्रकाला सभागृहाने मान्यता दिली. बैठकीत प्रारंभी माजी सिनेट सदस्य धनंजय रोंदळे, के. बी. दिवटे तसेच उदय वाघ, माजी सिनेट सदस्य प्रभाकर चव्हाण यांच्या मातोश्री जावत्राबाई चव्हाण, सिनेट सदस्य सतीश पाटील यांच्या मातोश्री मनकर्णिका पाटील हे दिवंगत झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहणारा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. प्रा. संजय सोनवणे, नितीन ठाकूर, अमोल सोनवणे, दिलीप पाटील यांनी हे ठराव मांडले. सभागृहाने या दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. सभागृहात काही अभिनंदनाचे ठराव संमत झाले. यामध्ये विष्णू भंगाळे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याबद्दल मांडलेल्या अभिनंदन ठरावाला ऍड. संदीप पाटील, दिलीप पाटील, प्रा. संजय सोनवणे, प्राचार्य आर. एस. पाटील, जी. वाय. पाटील यांनी अनुमोदन दिले. प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार यांनी सूत्रसंचालन केले. 

अंदाजपत्रकात तरतूद 
 बहिणाबाई चौधरी जन्मदिनी विद्यार्थी साहित्य संमेलन 5 लाख 
 विद्यापीठस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी 12 लाख 
 विद्यापीठ परिसरातील रस्त्यांची दुरुस्तीसाठी एक कोटी 
 विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहासाठी 35 लाख, 
 ज्ञानस्त्रोत केंद्रासाठी 26 लाख 
 अत्याधुनिक विश्‍लेषणात्मक साहित्य इमारतीसाठी 2 कोटी 
 बहिणाबाई अध्यासन केंद्रासाठी 1.5 कोटी, 
 विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या संशोधनासाठी अनुदान 1.5 कोटी 

प्रस्तावित योजना 
 दिव्यांगाच्या सोयी सुविधांसाठी विद्यापीठात रॅम्पस आणि लिफ्ट बसविणे 
 मोलगी येथे विद्यापीठ संचलित महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित. 
 शिक्षकांकरीता क्षमता विकास विकास कार्यशाळा वर्षभरात 4 
 पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय 8 कार्यशाळा 
 एम.एस्सी.च्या नवीन अभ्यासक्रमानुसार (सीबीसीएस) नवीन उपकरणे खरेदी 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com