नाथाभाऊ : लढवय्या लोकनेता : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

नाथाभाऊ : लढवय्या लोकनेता : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

एकनिष्ठ कार्यकर्ते, पक्षाच्या कोअर कमिटीतील सदस्य, विधिमंडळातील अभ्यासू सहकारी, विरोधी पक्षांवर आपल्या आक्रमक भाषणांमधून तुटून पडणारे नेते अन्‌ राजकीय व प्रशासकीय अशा दोन्ही पातळ्यांवर अनुभवसिद्ध वाटचाल करणारे नाथाभाऊ यांचा उल्लेख खऱ्याअर्थाने "लढवय्या लोकनेता' असाच करावा लागेल. सार्वजनिक जीवनात खानदेशसारख्या ग्रामीण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भागात काम करीत असताना त्यांनी लोकसंग्रह जमा करीत केवळ कार्यकर्ते जोडले नाहीत, तर प्रतिकूल स्थितीत जनसामान्यांपर्यंत पोचत पक्षविस्तारात महत्त्वपूर्ण योगदानही दिले. म्हणूनच कार्यकर्त्यांसाठी या लोकनेत्याची वाटचाल नेहमीच प्रेरणादायी ठरते... 

1990 च्या दशकात त्यावेळी भारतीय जनता पक्ष हा नावापुरता राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात असताना ज्या धुरिणांनी पक्षविस्तारासाठी स्वत:चे जीवन वेचले, त्यात खानदेशातून एकनाथराव खडसेंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. गेल्या तीन- चार दशकांपासून सुरू असलेला नाथाभाऊंचा हा प्रवास मला जळगावात विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असताना जवळून पाहण्याचा योग आला. आमदार म्हणून नाथाभाऊंचा कार्यकाळही तसा 1990 पासूनच ते पहिल्यांदा निवडून आल्यानंतर सुरू झाला. अर्थात, या पहिल्या "टर्म'मध्येच त्यांनी स्वत:तील नेतृत्व असे काही विकसित केले, की त्यानंतर नेता म्हणून त्यांना या क्षेत्रात त्यांच्या तोडीचा कुणी स्पर्धक आजपर्यंत भेटला नाही. रात्रंदिवस फिरस्ती, केवळ मतदारसंघच नव्हे; तर संपूर्ण जिल्हा, खानदेश त्यांनी पालथा घातला. तत्कालीन लोकनेते प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे यांची भक्कम साथ त्यांना मिळाली. त्यातून जळगाव जिल्ह्यात पक्ष रुजला अन्‌ वाढलाही. 

लोकप्रिय लोकप्रतिनिधी 
गेल्या सहा "टर्म'पासून ते मुक्ताईनगर मतदारसंघातून सातत्याने निवडून येत आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचे यापेक्षा मोठे प्रमाण असू शकत नाही. तत्कालीन युती सरकारमध्ये मंत्री असताना आणि नंतरही आमदार असताना विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते त्यांच्याकडे "पालक' म्हणूनच पाहायचे. मी जळगावात असताना अनेकदा त्यांच्याकडे परिषदेच्या कामानिमित्त जायचो. कुठल्याही स्तरावर काम अडले असेल तर त्यांच्याकडे गेल्यानंतर ते काम झालेच पाहिजे, असा आमचाच नव्हे; तर साऱ्यांचा समज. आजही ती परिस्थिती बदलली नाही, म्हणून त्यांच्याकडे कार्यकर्ते, जनसामान्यांचा त्या वेळसारखा "गोतावळा' आजही आढळून येतो. 

जनहितासाठी आग्रह 
सर्वसामान्यांचे प्रश्‍न मांडताना त्यांनी कधीही "आपला' आणि "परका' असा भेद केला नाही. समाजातील सर्व स्तरांतील लोकांच्या समस्या, विशेषत: शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन त्यांनी त्या- त्या वेळच्या सरकारांना नामोहरम केले. सरकार कुणाचेही असो; जनहिताच्या प्रश्‍नांवरून नाथाभाऊंची भूमिका नेहमीच सकारात्मक आणि स्पष्ट राहिली आहे. विधिमंडळात नागरी हिताच्या प्रश्‍नांसंदर्भात आवाज उठविताना त्यांची अभ्यासू व आक्रमक शैली सर्वश्रुत आहे. सरकारमध्ये मंत्री असतानाही काही तांत्रिक बाबींमुळे एखादे जनहिताचे काम अडत असेल, तर त्यावर सूक्ष्म अभ्यास करीत प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ते काम कायदेशीरपणे कसे तडीस नेता येईल, यात त्यांचा मोठा हातखंडा. म्हणूनच सरकार आमचे असो, की विरोधी पक्षाचे; नाथाभाऊंसारख्या नेत्याचे मार्गदर्शन त्यासाठीच अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते. 

विकासाचे "व्हीजनरी' 
1995 मध्ये भाजप- शिवसेनेचे युती सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर नाथाभाऊंकडे अर्थ व नियोजन, उच्च व तंत्रशिक्षण आणि नंतरच्या टप्प्यात पाटबंधारे खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या प्रत्येक महत्त्वपूर्ण खात्याचे कामकाज सांभाळताना त्यांनी त्यांच्यातील दूरदृष्टीचा परिचय साऱ्या महाराष्ट्राला करून दिला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री असताना प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी आयटीआय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांची निर्मिती यांसारखी कामे केली. पाटबंधारेमंत्री असताना तापी व कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती करीत त्यांनी हे उपेक्षित क्षेत्र सिंचनाच्या दृष्टीने समृद्ध करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला. त्याचे दृश्‍य परिणाम नंतर दिसू लागले. आताच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्येही पहिली दोन वर्षे विविध बारा खात्यांचे मंत्री असताना त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे अनेक समाजघटकांना त्याचा फायदा झाला. 
 
विकासाचे मार्गदर्शक 
नाथाभाऊंसारख्या नेत्यांच्या योगदानामुळेच पक्षाला सत्तेची फळे चाखता आली, असे म्हटले तरी अतिषयोक्ती ठरू नये. आज सरकारमध्ये काम करीत असताना अनेकदा त्यांच्या मार्गदर्शनाची गरज भासते. ते मंत्रिमंडळात नसले, तरी त्यांच्या सूचना आम्ही वेळोवेळी जाणून घेतो व त्यानुसार कारभार चालविण्याचा प्रयत्नही करीत असतो. कोणत्याही विकास प्रकल्पासाठी अथवा मोठ्या योजनेसंदर्भात त्यांचे मार्गदर्शन नेहमीच उपयुक्त ठरत असते. अभ्यासू, आक्रमक, जनसामान्यांचा नेता म्हणून नाथाभाऊंना दीर्घायुष्य लाभो, हीच परमेश्‍वर चरणी प्रार्थना...! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com